Ajaz Khan। Ullu app house arrest show : अभिनेता अजाज खानच्या वेब शो ‘हाऊस अरेस्ट’वरून मोठा गोंधळ सुरु आहे. झारखंडमधील पहिले भाजप खासदार निशिकांत दुबे आणि त्यानंतर आता राज्यातील भाजप आमदार चित्रा वाघ यांनी या शोवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे. अशातच आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या देखील आक्रमक झाल्या आहेत. एजाज खानचा हा कार्यक्रम अश्लील आणि समाजासाठी हानिकारक असल्याचा आरोप आहे. रुपाली चाकणकर यांनी पोलीस महासंचालकांना याबाबत पत्र लिहिलंय आहे. ‘हाऊस अरेस्ट’ हा शो उल्लू अॅपवर 18 वर्षांवरील प्रेक्षकांसाठी 20 एप्रिलपासून प्रसारित होत आहे. या शोचं सूत्रसंचालन अजाज खान करत आहे. तो याआधी ‘बिग बॉस 7’ चा स्पर्धक होता. त्याला 2021 मध्ये ड्रग्ज प्रकरणात अटकही झाली होती. अजाज कायमच वादात राहिलेला आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत राहणाऱ्या अजाज खानला अनेकवेळा तुरुंगाची देखील हवा खावी लागली होती. अहमदाबाद, गुजरातमध्ये जन्मलेला अजाज खान ‘दिया और बाती हम’ तसेच ‘करम अपना अपना’ सारख्या लोकप्रिय शोमध्ये दिसला आहे. तो ‘रक्त चरित्र’ आणि ‘अल्लाह के बंदे’ सारख्या चित्रपटांचाही भाग होता. त्याच वेळी, जर आपण अजाजबद्दल बोललो तर त्याचा वादांशीही खोल संबंध आहे. अजाज खान ड्रग्ज बाळगल्याच्या आरोपाखाली तुरुंगात गेला आहे. ‘बिग बॉस 7’मध्ये सहभागी झालेला अजाज खान शोमध्ये असतानाही वादांमुळे चर्चेत राहिला होता. अजाज खानने वर्सोवा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवली होती. खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पक्षाच्या (कांशीराम) तिकिटावर उमेदवारी दाखल केली होती. मात्र, निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर अजाजला मोठा धक्का बसला. स्वतःला मुंबईचा भाईजान म्हणवणारा अजाज खान वर्सोवाच्या या जागेवरून मते मिळवण्यात पूर्णपणे अपयशी ठरला. निवडणुकीत एजाज खान यांना केवळ 155 मते मिळाली. आझाद समाज पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढलेल्या एजाजला NOTA पेक्षा कमी मते मिळाली. 1298 लोकांनी NOTA बटण दाबले होते. अजाज खान आणि ड्रग्स प्रकरण : 2021 मध्ये ड्रग्स प्रकरणात अजाज खान याला अटक करण्यात आली होती. अभिनेत्याजवळ अल्प्राझोलम नावाच्या औषधांच्या 31 गोळ्या सापडल्या होत्या. त्यामुळे अभिनेत्यावर कारवाई करण्यात आली होती. ड्रग्स प्रकरणात अभिनेता 2 वर्ष तुरुंगवास भोगल्या नंतर अजाज खान याची सुटका झाली. 19 मे 2023 रोजी संध्याकाळी 6.40 वाजता अजाज खान याची आर्थर रोड तुरुंगातून सुटका झाली. हा अभिनेता कायमच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.