ऐरवी टुकू टुकू खेळणारा अजिंक्य ठरला सिक्सर ‘किंग’; 2023 च्या वर्ल्ड कप मध्ये मिळू शकते संधी…

कोलकाता – एखाद्या खेळाडूने कम बॅक कसा करावा याचे उत्तम उदाहरण म्हणून सध्या ‘अजिंक्य रहाणे’कडे बघितलं जातंय. एरवी टुकू टुकू खेळणारा अजिंक्य आता सिक्सर किंग म्हणून ओळखला जातोय. जुना रहाणे आणि आताचा रहाणे यात जमीन-आसमानाचा फरक जाणवत आहे. सध्या सुरु असलेल्या आयपीएलमध्ये तो प्रत्येक 9 चेंडूंनंतर सरासरी एक षटकार मारत आहे.
रहाणेचा मागील सर्वोत्तम विक्रम 2019 मध्ये 31 चेंडू प्रति षटकार मारत होता षटकार मारण्यासाठी त्याने आपला खेळ बदलला नाही तर केवळ आपली ताकद वाढवली आहे. असे त्यांने सांगितले आहे. अजिंक्यचा नेहमीचा टी-20 स्ट्राईक रेट 120.50 एव्हढा आहे. परंतु यंदा त्याचा स्ट्राइक रेट वाढून तब्बल 254.16 इतका झाला आहे.
रविवारी चेन्नई विरुद्ध केकेआरमध्ये झालेल्या सामन्यात चेन्नईकडून खेळताना अजिंक्यने 29 चेंडूत नाबाद 71 धावा केल्या. यामुळे ईडन गार्डन्सवर सीएसकेने 235 ही सर्वात मोठी टी-20 धावसंख्या रचली. आयपीएलच्या चालू हंगामातील ही सर्वोच्च धावसंख्या असून रहाणेचे मोठे योगदान या धावसंख्यामध्ये लाभले आहे. त्याच्या या स्फोटक खेळीमुळे 2016 नंतर आयपीएलमधील पहिलाच सामनावीराचा पुरस्कार मिळाला आहे.
2023 च्या वर्ल्ड कप मध्ये मिळू शकते संधी…
अजिंक्यने जर अशीच दमदार कामगिरी कायम ठेवली तर त्याला 2023 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप मध्ये संधी मिळू शकते. तसेच रिषभ पंत हा अजूनही दुखापतीतून सावरलेला नाही अजिंक्यकडे अनुभव आहे. त्यामुळे नंबर 4 वर फलंदाजी करण्यासाठी त्याला संधी मिळू शकते. असं देखील बोललं जात आहे.
चेन्नईचा कॅप्टन होऊ शकतो का?
दरम्यान, रविवारी धोनीने ‘माझा हा करीअर मधील शेवटचा हंगाम आहे’ असे जाहीर केले आहे. तर भविष्यातील चेन्नईचा कॅप्टन म्हणून अजिंक्य निवड होऊ शकते. अजिंक्यने या आधी राजस्थान रॉयलस या संघाचे नेतृत्व केले आहे. त्याच्याकडे योग्य निर्णय घेण्याची क्षमता आहे. तसेच तो अतिशय शांत असून आपली भूमिका संयमाने पार पडत असतो त्यामुळे त्याचा चेन्नईचा पुढील कर्णधार म्हणून निवड होऊ शकते.





