पुणे जिल्हा | घिरट्या घालणारे ड्रोन नव्हे तर विमाने

शिक्रापूर, (वार्ताहर)- पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी रात्रीच्या सुमारास ड्रोन कॅमेरा घिरट्या घालत असल्याबाबत अफवा पसरत असल्याचे समोर आलेले असताना शिरुर तालुक्यात देखील अनेक गावांमध्ये ड्रोन कॅमेऱ्याच्या घिरट्या होत असल्याचे समोर आले. मात्र, हे ड्रोन कॅमेरे नव्हे तर विमाने असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे देखील आवाहन करण्यात आले आहे.
निमगाव म्हाळुंगीसह घोलपवाडी, दहिवडी येथे (दि.५) जून रोजी रात्रीच्या सुमारास ड्रोन कॅमेरा घिरट्या घालत असल्याबाबतचा फोन शिक्रापूर पोलिसांना आला. दरम्यान, पोलिसांनी देखील गावांमध्ये धाव घेतली. यावेळी नागरिक देखील भल्या रात्री जागे होते. पोलिसांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता पोलिसांना सुद्धा काही माहिती मिळू शकली नाही.
या गावांमध्ये ड्रोन कॅमेरा घिरट्या घालत असल्याबाबतचे व्हीडीओ प्रसारित झाले. मात्र, या ड्रोन कॅमेराबद्दल तर्कवितर्क सुरू असताना ड्रोन कॅमेरे नसून पुणे जिल्ह्यातील लहान ट्रेनिंग विमाने आहेत. रात्रीच्या वेळी त्यांचे ट्रेनिंग सुरु असते. त्यामुळे कोणीही हे ड्रोन कॅमेरे आहेत.
कोठेही ड्रोनच्या माध्यमातून काही नुकसान झालेले नसून त्यामाध्यमातून चोरीच्या घटना घडलेल्या नाहीत, रात्री दिसणारे ड्रोन कॅमेरे नसून लहान विमाने असल्याचे समोर आले असल्याने कोणीही यावर विश्वास ठेवू नये. – दीपरतन गायकवाड, पोलीस निरीक्षक, शिक्रापूर.




