Belarus : बेलारुसमधून आलेल्या बलूनमुळे लिथुआनियातील विमान सेवा स्थगित

विलनियस, (लिथुआनिया) : बेलारूसमधून आलेल्या शेकडो बलूनमुळे लिथुआनियाच्या मुख्य विमानतळावरील उड्डाणे सलग दोन रात्री विस्कळीत झाली. अधिकाऱ्यांनी सोमवारी संभाव्य परिणामांवर चर्चा करण्याची योजना आखली आहे. सिगारेटची तस्करी करण्यासाठी बेलारुसमधून हे बलून सोडण्यात आल्याचा संशय आहे. शनिवारी रात्री ९:३५ वाजता हवाई वाहतूक बंद करण्यात आली आणि रविवारी पहाटे ३:३० वाजता विमानतळावरील हवाई क्षेत्र पुन्हा उघडण्यात आले. हवाई वाहतूक स्थगित केल्यामुळे चार विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आणि सात विमानांना दुसरीकडे वळवण्यात आले, असे विलनियस विमानतळाने सांगितले.
शुक्रवारी रात्री देखील विलनिअस विमानतळ आणि कौनास येथील विमानतळावर अशाच प्रकारे विमान वाहतूक स्थगित करावी लागली होती. त्यामुळे एकूण १० विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आणि चार विमाने अन्य विमानतळांकडे वळवण्यात आली. बुधवारी सकाळी देखील बलूनमुळे हवाई वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता. बलूनमुळे लिथुआनियाचे बेलारूसशी असलेले मेडिनिंकाई आणि अल्सिनिनंकाई ही दोन्ही सीमा क्रॉसिंगअनेक तासांसाठी बंद ठेवण्यात आले होते.
लिथुआनियाला बेलारूससोबतची सीमा दीर्घकाळासाठी बंद करण्याचा विचार करावा लागू शकतो. सरकार तस्करांसाठी कठोर शिक्षा देण्याचा विचार करत आहे, असा इशारा लिथुआनियाच्या पंतप्रधान इंगा रुगिनिएन यांनी दिला आहे. संभाव्य उपाययोजनांवर विचार करण्यासाठी रुगिनिएन यांनी सोमवारी लिथुआनियाच्या राष्ट्रीय सुरक्षा आयोगाची बैठक बोलावली आहे.





