दक्षिण कोरियावर पुन्हा बलून पाठवणार – किम यो जोंग

सेऊल : दक्षिण कोरियावर कचऱ्याने भरलेले बलून पुन्हा पाठवले जातील, असे सूतोवाच उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांच्या भगिनी किम यो जोंग यांनी केले आहे. दक्षिण कोरियाकडून उत्तर कोरियाच्या सीमाभागात आपल्या स्वतःच्या बलूनमधून राजकीय पत्रके टाकली जाण्याला लवकरच प्रत्युत्तर दिले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
मे महिन्याच्या अखेरपासून उत्तर कोरियाकडून अनेक वेळा कचऱ्याने भरलेले शेकडो बलून दक्षिण कोरियावर सोडले गेले होते. या बलूनमध्ये कागद, कपड्यांचे तुकडे, सिगारेटची थोटके आणि काही वेळा मानवी विष्टा देखील भरलेली असायची. दक्षिण कोरियाच्या कृत्यांना जशास तसे असे प्रत्युत्तर दिले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
उत्तर कोरियाच्या बलूनमधून कोणताही घातक पदार्थ दक्षिण कोरियामध्ये सोडला गेलेला नव्हता. तसेच या बलूनमुळे कोणतीही जीवितहानी देखील झाली नव्हती. मात्र दक्षिण कोरियामध्ये या बलूनमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाचे हे बलून फोडून टाकले होते. या बलून मोहीमेला उत्तर म्हणून दक्षिण कोरियाने २०१८ च्या शांतता करारातून बाहेर पडल्याचे जाहीर केले. यामुळे कोरियाच्या समुद्रात युद्धसराव करणे दक्षिण कोरियाला शक्य होणार आहे.





