बेलारुसच्या अध्यक्षपदी पुन्हा अलेक्झांडर ल्युकाशेंको

मिन्स्क , (बेलारुस) – गेल्या तीन दशकांपासून बेलारुसचे हुकुमशहा असलेल्या अलेक्झांडर ल्युकाशेंको यांनी देशाच्या अध्यक्षपदाची आपली मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. गेल्या आठवड्यात घेतलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीवर विरोधकांनी बहिष्कार घातला होता. ही निवडणूक म्हणजे एक नाटक असल्याची टीका विरोधकांनी आणि युरोपीय संघाने केली होती. विरोधकांच्या अनुपस्थितीत झालेलीया या निवडणूकीत ल्युकासेंको विजयी झाल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले. या निवडणुकीत ल्युकाशेंको यांना तब्बल ८७ टक्के मते मिळाली होती. त्यांना आव्हान देणारे चारही उमेदवार हे त्यांचेच पाठीराखे होते.
देशातील प्रमुख विरोधी पक्षांचे नेते सध्या एकतर तुरुंगात आहेत किंवा त्यांना देशाबाहेर हद्दपार करण्यात आले आहे. ल्युकाशेंको यांच्याकडून विरोधकांना आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याला दडपण्याच्या धोरणामुळे विरोधकांना देशाबाहेर जावे लागले आहे. देशातले १,३०० राजकीय कैदी तुरुंगात आहेत. त्यात शांततेचे नोबेल पुरस्कार विजेते आणि वियास्ना मानवाधिकार केंद्राचे संस्थापक एलेस बियालियात्स्की यांचाही समावेश आहे.
ल्युकाशेंको यांची ही निवडणूक २०२० च्या निवडणुकीप्रमाणेच बनावट असल्याची टीका या विरोधकांनी केली आहे. यापुर्वीच्या निवडणुकीच्या विरोधात बेलारुसमद्ये अनेक महिने आंदोलन सुरू राहिले होते. तेंव्हापासून देशभरातील जवळपास ६५ हजार लोकांना अटक करण्यात आली असून हजारो जणांना पोलिसांच्या कारवाईदरम्यान मारहाण देखील झाली आहे. या कारवाईविरोधात देशभरातून आणि पाश्चात्य देशांमधून मोठी टीका झाली होती. युरोपीय संघाने देखील रविवारी झालेली निवडणूक बेकायदेशीर असल्याचे म्हणून पेटाळून लावली आहे. तसेच बेलारुसवर नव्याने निर्बंध घालण्याचा इशारा दिला आहे.
या निवडणुकीत मतदारांना मतदानासाठी पर्यायच ठेवला गेला नव्हता, असे जर्मनीचे परराष्ट्र मंत्री ऍनालेना बाएरबोक यांनी केली आहे.
२०२० प्रमाणे या वेळीही देशभर आंदोलन होण्याची भीती ल्युकाशेंको यांना वाटत असावी. म्हणूनच त्यांनी निवडणुका ऑगस्ट ऐवजी जानेवारीत घेतल्या. प्रचंड थंडी असल्यामुळे लोक रस्त्यावर उतरू शकणार नाहीत, यासाठीच हा निर्णय घेतल्याचे निरीक्षकांचे मत आहे.
सत्तेवर पोलादी पकड –
अलेक्झांडर ल्यकाशेंको १९९४ पासून देशाचे अध्यक्ष आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्याकडून ल्युकाशेंको यांना पुर्ण पाठिंबा आणि मदत मिळते आहे. पुतीन स्वतः देखील जवळपास पाव शतकापासून रशियाच्या अध्यक्षपदी विराजमान आहेत. पुतीन यांच्याच पाठिंब्यामुळे ल्युकासेंको २०२० च्या आंदोलनानंतरही टिकून राहिले आहेत. ल्युकाशेंको यांनी देखील युक्रेनवरील आक्रमणामद्ये रशियाला मदत केली आहे. खबरदारी म्हणून रशियाची काही अण्वस्त्रे बेलारुसमध्ये ठेवली गेली आहेत. निवडणुकीतील विजयाबद्दल पुतीन यांच्याप्रमाणे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी ल्युकाशेंको यांचे अभिनंदन केले आहे.





