सिहोर : ऑपरेशन सिंदूरचे यश सिहोरमध्ये साजरे करण्यात आले. या कारवाईच्या यशाबद्दल मुस्लिमांनी भारतीय सेना झिंदाबादच्या घोषणा दिल्या, तर फटाके फोडून आणि एकमेकांना मिठाई खाऊ घालून आनंद साजरा केला. ऑपरेशन सिंदूरच्या यशाचे सेलिब्रेशन संपूर्ण जिल्ह्यात सुरूच होते. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या १५ दिवसांनंतर भारताने मोठे प्रत्युत्तर दिले. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत बहावलपूर, मुरीदके, बाग, कोटली आणि मुझफ्फराबाद सारख्या दहशतवाद्यांचे गड लक्ष्य करून ही कारवाई केली. या धाडसी पाऊलावर देशभर आनंदाची लाट आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांवर क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे असून देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे उत्तर आणि पश्चिम भारतातील किमान १८ विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. या बंद विमानतळांमध्ये श्रीनगर, जम्मू, लेह, अमृतसर, पठाणकोट, चंदीगड, जोधपूर, जैसलमेर, शिमला, धर्मशाला आणि जामनगरचा समावेश आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर विमान वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. आतापर्यंत २०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. एकट्या इंडिगोने सुमारे १६५ उड्डाणे रद्द केली आहेत. दिल्ली विमानतळावरून ३५ हून अधिक उड्डाणे (२३ निर्गमन, ८ आगमन आणि ४ आंतरराष्ट्रीय उड्डाणे) रद्द करण्यात आली आहेत.