अहमदाबाद विमान अपघातात २६५ जणांचा मृत्यू ; पंतप्रधान मोदी सकाळी ८:३० वाजता घटनास्थळी भेट देणार

Air India Plane Crash । गुजरातमधील अहमदाबाद याठिकाणी गुरुवारी झालेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून टाकले. अहमदाबादहून लंडनच्या गॅटविक विमानतळावर निघालेले एअर इंडियाचे विमान AI171 हे उड्डाणानंतर काही मिनिटांतच मेघनीनगर परिसरात कोसळले. या अपघातात आतापर्यंत २६५ जणांचा मृत्यू झाला आहे.
या विमानात एकूण २४२ जण होते, ज्यात २ पायलट आणि १० केबिन क्रू सदस्यांचा समावेश आहे. अपघातानंतर घटनास्थळी झालेली विध्वंसाची घटना इतकी भयानक होती की सर्वांचे हृदय हेलावून गेले. या अपघातातून फक्त एकच प्रवासी वाचला. हा प्रवासी ११ A सीटवर बसला होता आणि त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांच्या मते, त्याची प्रकृती गंभीर परंतु स्थिर आहे.
गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते विजय रुपाणी यांचेही या अपघातात निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते आणि विमानाच्या बिझनेस क्लासमध्ये २डी सीटवर बसले होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात शोककळा पसरली आहे. या अपघाताची खरी कारणे शोधण्यासाठी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) आणि एअर इंडियाची तांत्रिक टीम घटनास्थळाची चौकशी करत आहे. Air India Plane Crash ।
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ८:३० वाजता अहमदाबादला भेट देतील. त्यांचा दौरा सुमारे दोन तासांचा असेल. पंतप्रधान मोदी विमानतळावरून थेट अपघातस्थळी जातील, जिथे ते घटनास्थळाची पाहणी करतील आणि मदत कार्याचा आढावा घेतील. त्यानंतर ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचून जखमी प्रवाशाला भेटू शकतील.
या भीषण विमान अपघातानंतर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घटनास्थळ आणि रुग्णालयाला भेट दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की भारत सरकार आणि गुजरात सरकारचे सर्व विभाग एकत्रितपणे मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. त्यांनी पुष्टी केली की विमानात एकूण २४२ लोक होते, ज्यात २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्स होते. यापैकी एक प्रवासी वाचला, ज्याला त्यांनी स्वतः भेटले. ते म्हणाले, “अपघाताच्या वेळी विमानात सुमारे १.२५ लाख लिटर इंधन होते आणि उष्णतेमुळे भीषण आग लागली. यामुळे बहुतेक लोकांना वाचवता आले नाही. Air India Plane Crash ।
हेही वाचा
अग्रलेख : हिमकड्यांची आर्त किंकाळी





