अबाऊट टर्न : धमकीचा बॉम्ब….

लहानपणी कागदाची विमानं करून उडवणं वेगळं; पण खरंखुरं विमान बॉम्बने उडवणं किंवा तशी धमकी देणं हा काही पोरखेळ नव्हे. अवघ्या सोळा-सतरा वर्षांच्या मुलाने तो खेळावा आणि शेकडो प्रवाशांसह विमानतळावरच्या कर्मचार्यांना वेठीला धरावं, हे मान्य आणि सहन करण्यापलीकडचं आहे.
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून न्यूयॉर्कला जाणारं एअर इंडियाचं विमान उड्डाण करतं आणि बातमी येते की विमानात सहा किलो आरडीएक्स आणि सहा दहशतवादी आहेत. ही बातमी एका ‘एक्स’ अकाउंटवरून मिळालेल्या धमकीवर आधारित असते. प्रवाशांची पाचावर धारण बसलेली असतानाच विमानाचं दिल्ली विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग केलं जातं. तपासणीत काहीच आढळत नाही. त्याच दिवशी इंडिगोच्या आणखी दोन विमानांमध्ये बॉम्ब असल्याच्या धमक्या मिळतात.
उड्डाणापूर्वीच विमानांची तपासणी होते; पण काहीच सापडत नाही. हा गोंधळ सुरू असतानाच मुंबई हावडा मेलमध्ये बॉम्ब ठेवल्याची बातमी येते. परंतु तिथेही काहीच हाती लागत नाही. सगळीकडे फक्त भीतीची लाट आणि प्रवाशांचा खोळंबा! सखोल तपासानंतर या घटनेचे धागेदोरे छत्तीसगडपर्यंत जातात आणि एका अल्पवयीन मुलाला पोलीस ताब्यात घेतात. त्या मुलाची म्हणे मोबाइलच्या व्यवसायात मित्राबरोबर भागीदारी होती. व्यवसाय बंद पडला आणि त्याचे तीन लाख रुपये मित्राकडे अडकले. आता मित्राला कशाततरी अडकवणं भागच आहे, असं मनात ठेवून त्यानं फेक अकाउंटवरून फेक पोस्ट टाकली.
ही झाली एक स्टोरी. पण अवघ्या अठ्ठेचाळीस तासांत तेरा विमानांमध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळणं हे सुरक्षा यंत्रणेला दिलेलं आव्हान आहे. सर्वच्या सर्व धमक्या पोकळ निघाल्या, हा भाग वेगळा; पण हे सगळं केवळ गंमत म्हणून केलं जातंय की यंत्रणेला गाफील ठेवण्यासाठी? याचं उत्तर शोधावंच लागेल. एअर इंडिया, एक्स्प्रेस, विस्तारा, स्पाइसजेट, आकासा एअर, इंडिगो या सर्व भारतीय कंपन्या आहेत आणि त्यांच्या देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. या सर्व विमानांचा मार्ग बदलून ती मध्येच उतरवावी लागली. लंडनमधून दिल्लीकडे येणार्या विमानाच्या स्वच्छतागृहात एका प्रवाशाला टिश्यू पेपरवर धमकीचा मजकूर दिसला. भागीदारीत पैसे अडकल्याची स्टोरी सांगणार्या अल्पवयीन मुलानं ‘एक्स’ अकाउंट हॅक करून दिलेली धमकी आणि इतर विमानांना मिळालेल्या धमक्या यात काही समान सूत्र असावं का? नसल्यास दोन दिवसांत इतक्या विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याचे हॉक्स कॉल कुठून आणि का आले? टिश्यू पेपरवरील मजकूर कुणी लिहिला? भारतीय कंपन्यांची विमानेच का ‘टार्गेट’ करण्यात आली? अशा अनेक प्रश्नांची उकल यंत्रणांना करावी लागणार आहे.
धमक्या एकसारख्या असल्या तरी त्यांचे स्रोत वेगवेगळे आहेत, हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. मदुराई-सिंगापूर विमानाने उड्डाण केल्यानंतर विमान कंपनीला ई-मेल आला होता. काही महिन्यांपूर्वीही अशा दोन-तीन घटना घडल्या होत्या. धमकी खरी असो वा खोटी, विमान कंपन्या प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी पूर्ण तपासणी करतात; पण वेळेचा आणि पैशांचा अपव्यय होतोच. शिवाय अशा घटना वारंवार घडू लागल्यास त्याचा गैरफायदा घेतला जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. म्हणूनच हा धमकीचा बॉम्ब वेळीच निकामी केला पाहिजे.





