Air India Flight : मुंबईहून अमेरिकेतील नेवार्ककडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइट AI-191 ला उड्डाणानंतर अवघ्या तीन तासांत तांत्रिक बिघाडामुळे परत यावे लागले. मात्र, विमानात नेमका कोणता बिघाड झाला होता, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. फ्लाइट रडार-24 नुसार, विमानाने मुंबई विमानतळावरून रात्री १:१५ वाजता उड्डाण केले होते. सुमारे तीन तासांनंतर क्रू मेंबर्सना तांत्रिक त्रुटीची शक्यता जाणवली. त्यानंतर विमान मुंबईत सुरक्षितरीत्या उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला. लँडिंगनंतर विमान तपासणीसाठी सेवेतून बाहेर काढण्यात आले आहे. या कारणामुळे मुंबई–नेवार्क दरम्यानची दोन्ही फ्लाइट्स AI-191 आणि AI-144 (नेवार्क–मुंबई) रद्द करण्यात आल्या आहेत. एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, “मुंबईत अडलेल्या प्रवाशांसाठी हॉटेल आणि पर्यायी उड्डाणांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच नेवार्कमध्ये असलेल्या प्रवाशांनाही याची माहिती देण्यात आली असून, त्यांच्या सोयीसाठी आवश्यक ती पावले उचलली जात आहेत.” याआधीही एअर इंडिया विमानांमध्ये तांत्रिक समस्या : १७ ऑक्टोबरला, हाँगकाँग विमानतळावर एअर इंडियाच्या दिल्ली–हाँगकाँग मार्गावरील AI-315 ड्रीमलाइनर विमानात उड्डाणापूर्वी तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. उड्डाणाच्या आधीच विमानाचा एक भाग रिसेट करावा लागला. मिळालेल्या आकडेवारीनुसार, या बोईंग 787-8 विमानाने सकाळी ८:५० वाजता उड्डाण करायचे होते, परंतु तांत्रिक कारणांमुळे जवळपास तीन तास उशिरा म्हणजे ११:३० वाजता ते रवाना झाले. हेच विमान १८ दिवसांपूर्वीही समस्याग्रस्त ठरले होते. अमृतसरहून बर्मिंगहॅमकडे जात असताना, विमानाची रॅम एअर टर्बाइन (RAT) अचानक सक्रिय झाली होती. त्यामुळे वैमानिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपत्कालीन लँडिंग केली होती. पक्षीधडकेमुळे फ्लाइट रद्द ! ७ ऑक्टोबरला, एअर इंडियाच्या कोलंबो–चेन्नई फ्लाइटच्या इंजिनला पक्षी धडकल्यामुळे विमानाला नुकसान झाले. त्यामुळे सुरक्षा कारणास्तव चेन्नईहून कोलंबोकडे जाणारी परतीची फ्लाइट रद्द करण्यात आली. एअरपोर्ट अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, विमान चेन्नई विमानतळावर उतरण्याच्या अगोदरच पक्षी इंजिनला धडकला आणि इंजिनमधून असामान्य आवाज येऊ लागला. वैमानिकांनी तत्काळ निर्णय घेत विमान सुरक्षितरीत्या उतरवले.