Indian Air Force crash : हवाईदलाचे ट्रेनी विमान कोसळले; जलपर्णीमुळे विमानासह पायलट वाचले

प्रयागराज – उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये आज दुपारी भारतीय हवाईदलाचे एक प्रशिक्षण विमान कोसळून अपघात झाला. हे विमान शहरानजीक असलेल्या केपी कॉलेजमागील एका जलपर्णीने भरलेल्या तलावात कोसळले. वैमानिकांच्या प्रसंगावधानामुळे दाट लोकवस्तीच्या भागात कोसळण्याऐवजी विमान तलावात पडल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.
उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमानाचे संतुलन बिघडले. विमानाचे इंजिन निकामी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रॉकेटसारखा मोठा आवाज ऐकू आल्याने परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. विमानात दोन वैमानिक होते, त्यांनी तातडीने पॅराशूटच्या साहाय्याने विमानातून उडी घेतली. तलावात जलपर्णीचे दाट थर असल्याने विमान पाण्यात बुडाले नाही आणि वैमानिकांनाही सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.
ज्या ठिकाणी हा अपघात झाला, तिथे केपी कॉलेजमध्ये प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होती आणि आसपास मोठी वस्ती आहे. वैमानिकांनी विमान रिकाम्या तलावाकडे वळवले आणि रेड क्रॅश सिग्नल दिला, ज्यामुळे जमिनीवरील नागरिक सावध झाले. दोन्ही वैमानिकांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.





