International Students Day: विद्यार्थी जीवनातच स्वप्नांची उंच झेप; तंत्रज्ञान, कौशल्य आणि उद्योजकतेच्या नव्या वाटा
शिक्षण व्यवस्थेसमोर बदलाचे आव्हान

पिंपरी – एकेकाळी विद्यार्थ्यांच्या हुशारीचे मोजमाप परीक्षेतील गुण, पाठांतर आणि शैक्षणिक गुणवत्तेवर केले जात होते. मात्र, काळ बदलला तशी विद्यार्थ्यांची स्वप्नेही बदलली आहेत. आता केवळ चांगले गुण मिळवून पदवी संपादन करणे, एवढेच विद्यार्थ्यांचे ध्येय राहिलेले नाही.
स्वतःचे तंत्रज्ञान विकसित करणे, नवे व्यवसाय उभारणे, डिजिटल जगात स्वतंत्र ओळख निर्माण करणे आणि जागतिक स्तरावर आपले कौशल्य सिद्ध करणे, अशी महत्त्वाकांक्षा नव्या पिढीत दिसत आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), गेमिंग, कंटेंट क्रिएशन, डेटा सायन्सपासून पर्यावरण संवर्धनापर्यंत विविध क्षेत्रांत विद्यार्थी स्वतःला आजमावत आहेत. त्यामुळे पुस्तकी किडा ही पारंपरिक ओळख मागे पडत असून, कल्पकता, प्रयोगशीलता आणि तंत्रज्ञानाची सांगड घालणारा स्मार्ट इनोव्हेटर घडत आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या या बदलत्या आकांक्षांशी शिक्षण व्यवस्था कितपत जुळवून घेत आहे, हा प्रश्न आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिनाच्या निमित्ताने ऐरणीवर आला आहे.
नव्या संधींची दारे खुली होत असतानाच विद्यार्थ्यांसमोर काही नवी आव्हानेही उभी राहिली आहेत. गुणांची स्पर्धा, पालकांच्या अपेक्षा, करिअरविषयीची अनिश्चितता आणि भविष्यातील रोजगाराची चिंता यामुळे मानसिक ताण वाढत आहे. परदेशी शिक्षणाचे आकर्षण, वाढता स्क्रीन टाइम आणि सोशल मीडियावरील तुलना यांचाही विद्यार्थ्यांच्या जीवनशैलीवर परिणाम होत आहे.
या पार्श्वभूमीवर काही विद्यार्थी पुन्हा वाचन, ग्रंथालये, पुस्तक चर्चा गट आणि डिजिटल डिटॉक्सकडे वळताना दिसत आहेत. तंत्रज्ञान स्वीकारताना स्वतःच्या मानसिक आणि बौद्धिक आरोग्याची काळजी घेण्याची जाणीवही नव्या पिढीत निर्माण होत आहे.
पारंपरिक करिअरच्या चौकटी मोडल्या
एकेकाळी डॉक्टर, अभियंता, वकील किंवा सरकारी अधिकारी होण्याभोवती विद्यार्थ्यांच्या करिअरची स्वप्ने केंद्रित असायची. मात्र आता विद्यार्थ्यांना केवळ नोकरी मिळवायची नाही, तर स्वतःच्या कल्पनांच्या जोरावर रोजगार निर्माण करण्याचीही इच्छा आहे.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच काही विद्यार्थी कंटेंट क्रिएशन, व्हिडिओ एडिटिंग, ग्राफिक डिझायनिंग आणि फ्रीलान्सिंगच्या माध्यमातून उत्पन्न मिळवत आहेत. सोशल मीडिया हे त्यांच्यासाठी केवळ मनोरंजनाचे साधन न राहता कौशल्य सादर करण्याचे आणि आर्थिक स्वावलंबन मिळवण्याचे व्यासपीठ बनले आहे.
पदवीपेक्षा कल्पकतेला महत्त्व देण्याची वेळ
आजच्या विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासक्रम पूर्ण करणारे पदवीधर बनवून चालणार नाही, तर प्रश्न विचारणारे, नवनिर्मिती करणारे, संशोधन करणारे आणि समाजातील समस्या सोडवण्याची क्षमता असलेले नागरिक म्हणून घडवणे आवश्यक आहे.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी पाहिलेल्या विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला योग्य व्यासपीठ, संशोधनाला प्रोत्साहन आणि कौशल्यांना संधी मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी पुस्तकी ज्ञानासोबत व्यावहारिक अनुभव, तंत्रज्ञान, उद्योजकता आणि सामाजिक जाणीव यांचा समतोल साधावा लागेल.





