Sunil Chhetri : स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्रीचा मोठा निर्णय! आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून मागे घेतली निवृत्ती

Sunil Chhetri has withdrawn his retirement from international football : भारताचा सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू आणि माजी कर्णधार सुनील छेत्रीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीच्या निर्णयावर यू-टर्न घेतला आहे. सुनील छेत्री आता मार्चमध्ये होणाऱ्या फिफा आंतरराष्ट्रीय विंडोमध्ये भारतीय संघाकडून खेळताना दिसणार. २५ मार्च रोजी भारताचा सामना बांगलादेशविरुद्ध होईल, जो एएफसी आशियाई कप २०२७ चा तिसरा फेरीचा पात्रता सामना असेल.
भारतीय फुटबॉल संघासोबत १९ गौरवशाली वर्षे घालवल्यानंतर सुनील छेत्रीने गेल्या वर्षी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला अलविदा केला होता. त्याने १६ मे २०२४ रोजी त्याने जाहीर केले होते की, फिफा विश्वचषक पात्रता फेरीतील कुवेत विरुद्धचा सामना हा त्याचा शेवटचा सामना असेल.
आता अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (AIFF) त्यांच्या अधिकृत एक्स हँडलद्वारे माहिती दिली की, सुनील छेत्रीने परतण्याचा निर्णय घेतला आहे.
Maybe all goodbyes are just an ‘I’ll see you soon’ in disguise.
Pull the bookmark out. Search for the key. Press play. ▶️ #TheStoryContinues #IndianFootball #SunilChhetri 🇮🇳 pic.twitter.com/VGKgvwF3mI
— Bengaluru FC (@bengalurufc) March 6, 2025
सुनील छेत्रीची कारकीर्द अनेक यशाने भरलेली आहे. त्याने भारतीय संघासाठी अनेक महत्त्वाच्या प्रसंगी गोल केले आहेत आणि संघाला विजयाकडे नेले आहे. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर ९४ गोल केले आहेत आणि तो जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे. त्याच्या पुढे फक्त क्रिस्टियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी आणि अली दाई आहेत.
इंडियन सुपर लीगमध्ये सुनील छेत्रीचे वर्चस्व कायम –
आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील निवृत्तीनंतरही सुनील छेत्रीने इंडियन सुपर लीग (ISL) मध्ये आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. या हंगामात तो बेंगळुरू एफसीसाठी उत्तम फॉर्ममध्ये आहे. २०२४-२५ हंगामात आतापर्यंत त्याने १२ गोल केले आहेत आणि २ असिस्ट देखील नोंदवले आहेत.
सुनील छेत्रीने या हंगामात बेंगळुरू एफसीसाठी २३ सामने खेळले आहेत, त्यापैकी १७ सामन्यांमध्ये तो प्लेइंग इलेव्हनचा भाग राहिला आहे. निवृत्तीच्या वेळी सुनील छेत्रीने स्पष्टपणे सांगितले होते की त्यांचा हा निर्णय तंदुरुस्तीमुळे नव्हता. भारताच्या एएफसी आशियाई कप पात्रता गटात बांगलादेश, हाँगकाँग (चीन) आणि सिंगापूर यांचा समावेश आहे. भारत शिलाँगमध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.




