Chandrakant Patil : राज्यात एआय विद्यापीठाची होणार स्थापना; विद्यापीठासंदर्भात समिती गठीत करण्याचे चंद्रकांत पाटलांचे आदेश

मुंबई : विकसित भारत 2047 मिशनच्या यशस्वी पूर्ततेसाठी आणि भारताच्या 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचालीसाठी शिक्षण आणि तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) विद्यापीठ लवकरच स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी समिती गठीत करावी, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.
मंगळवारी, मंत्रालयात चंद्रकांत पाटील, माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थित आज बैठक पार पडली. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव, बी. वेणुगोपाल रेड्डी, माहिती तंत्रज्ञान प्रधान सचिव पराग जैन-नैनुटीया, उपसचिव अशोक मांडे, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ.प्रमोद नाईक संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, अत्याधुनिक संशोधन, उद्योग आणि तंत्रज्ञान यांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना आणि तरुणांना आवश्यक आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचे आणि जागतिक स्पर्धेत टिकवून ठेवणारे ज्ञान उपलब्ध होईल असे विद्यापीठ असावे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान भविष्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. एआय किंवा संबंधित क्षेत्रांवर प्रभुत्व मिळवल्यास मोठ्या आणि फायदेशीर रोजगाराच्या संधी मिळू शकतात. या पार्श्वभूमीवर देशात पहिल्या एआय विद्यापीठाची स्थापना होईल, असे मंत्री आशिष शेलार म्हणाले.
याला अधिक गती देण्यासाठी एक विशेष कृतीदल (टास्क फोर्स) स्थापन करण्यात आला आहे. यामध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव, बी वेणुगोपाल रेड्डी, माहिती तंत्रज्ञान प्रधान सचिव पराग जैन-नैनुटीया, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ.प्रमोद नाईक, परेश पागे यांचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले.





