Satara: कोल्हापूरला एआयचा आरोग्य पहारा; सातार्याला मात्र प्रतीक्षा!
Satara कोल्हापूर जिल्ह्यातील 12 तालुक्यांमधील 104 शासकीय आरोग्य संस्थांचे कामकाज एका जिल्हास्तरीय डिजिटल कमांड सेंटरशी जोडले जाणार आहे. त्यामुळे रुग्णालयाशी संबंधित विविध बाबींवर एकाच ठिकाणाहून लक्ष ठेवता येणार आहे.

Satara: आरोग्य व्यवस्थेतील अनागोंदीला आळा घालण्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) मदत घेतली जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात राज्यातील पहिल्या ‘महा-पल्स एआय’ प्रकल्पाची अंमलबजावणी होत असताना सातारा जिल्ह्यातही अशाच आधुनिक यंत्रणेची मागणी जोर धरू लागली आहे. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालये आणि अन्य शासकीय आरोग्य संस्थांना डिजिटल नियंत्रण यंत्रणेची जोड मिळाल्यास आरोग्यसेवेचा दर्जा उंचावण्यास मदत होणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 12 तालुक्यांमधील 104 शासकीय आरोग्य संस्थांचे कामकाज एका जिल्हास्तरीय डिजिटल कमांड सेंटरशी जोडले जाणार आहे. त्यामुळे रुग्णालयाशी संबंधित विविध बाबींवर एकाच ठिकाणाहून लक्ष ठेवता येणार आहे. रुग्णालयात घडलेल्या आपत्कालीन घटनांची माहितीही तत्काळ संबंधित यंत्रणेला मिळणार आहे. त्यामुळे केवळ तक्रारीनंतर हालचाल करण्याऐवजी संभाव्य समस्यांवर वेळीच उपाययोजना करणे शक्य होईल. विशेष म्हणजे, रुग्णालयांच्या कामगिरीचे मूल्यांकन करून त्यांना स्टार रेटिंग देण्याची संकल्पनाही या प्रकल्पात आहे. नागरिकांनाही कोणत्या रुग्णालयात कोणते डॉक्टर उपलब्ध आहेत, औषधांचा साठा किती आहे आणि कोणत्या सुविधा मिळतात, याची माहिती घरबसल्या मिळण्याचा मार्ग खुला होणार आहे.
आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांनी नुकत्याच केलेल्या राजस्थान दौर्यात तेथील ‘महा-पल्स’ उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी पाहिली. त्यानंतर महाराष्ट्रातही अशा प्रणालीची अंमलबजावणी करण्याचा संकल्प त्यांनी केला असून, पहिल्या टप्प्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. याच धर्तीवर सातार्याचाही समावेश व्हावा, अशी अपेक्षा आरोग्य क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
सातार्याला पाच मंत्र्यांचे राजकीय पाठबळ!
सातारा जिल्ह्यात पाच मंत्रिपदे असताना आरोग्य व्यवस्थेच्या आधुनिकीकरणासाठी एकत्रित राजकीय इच्छाशक्ती दाखविण्याची ही संधी आहे. शिवसेनेचे नेते आणि आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांच्या माध्यमातून या प्रस्तावाला गती मिळू शकते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मूळ गाव महाबळेश्वर तालुक्यातील दरे असल्याने सातार्याशी त्यांचे विशेष नाते आहे. त्यांनीही या विषयात लक्ष घातल्यास जिल्ह्याला आधुनिक आरोग्य सुविधांचा लाभ मिळणे शक्य आहे.
सातार्याच्या क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयामध्ये जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या दोन तृतीयांश लोकसंख्या येथे उपचार घेते. डिजिटल आरोग्य यंत्रणेसाठी सातारा जिल्हा आणि येथील आरोग्यसेवा अनुकूल असल्याचे मत नोंदवले गेले आहे. त्या प्रस्तावना मात्र राजकीय इच्छाशक्तीचे पाठबळ गरजेचे आहे .वुमन्स हॉस्पिटल मेडिकल कॉलेज एमआरआय ची सुविधा डायलिसिस यंत्रणा एन आय सी यु युनिट अशा विविध आरोग्य सोयी उपलब्ध असल्याने येथे डिजिटल आरोग्य यंत्रणा उभारली जावी अशी मागणी पुढे येत आहे .
कोल्हापूरमध्ये डिजिटल आरोग्य व्यवस्थेचा प्रयोग आकाराला येत असताना सातार्याने केवळ प्रतीक्षा न करता या सुविधेसाठी ठोस प्रस्ताव मांडण्याची गरज आहे. जिल्हा रुग्णालयापासून ग्रामीण आरोग्य संस्थांपर्यंत एआयचे जाळे विस्तारल्यास रुग्णसेवेतील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कार्यक्षमता वाढण्यास निश्चितच मदत होईल.





