Pune District : ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी एआय लॅब ठरणार मैलाचा दगड; आधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षणासाठी प्रभावी वापर करा : अॅड. संदिप कदम
Pune District : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्हावरे (ता. शिरूर) येथील श्री मल्लिकार्जुन विद्यालयात एअर. जी. अजितदादा (AI) इनोव्हेशन लॅब व डिजिटल क्लासरूमच्या उद्घाटनासह संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अॅड. कदम प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

न्हावरे : आजच्या आधुनिक आणि तंत्रज्ञानाधारित युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हे शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचे साधन बनले आहे. काळानुरुप बदलणाऱ्या आधुनिक शैक्षणिक प्रवाहाशी विद्यार्थ्यांनी स्वतःला जोडून घेत आधुनिक शैक्षणिक पद्धतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव अॅड. संदिप कदम यांनी केले.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्हावरे (ता. शिरूर) येथील श्री मल्लिकार्जुन विद्यालयात एअर. जी. अजितदादा (AI) इनोव्हेशन लॅब व डिजिटल क्लासरूमच्या उद्घाटनासह संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अॅड. कदम प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी संस्थेचे सहसचिव ए. एम. जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य अॅड. वसंतराव कोरेकर, माजी सरपंच गौतम कदम, प्राचार्य बी. के. भालेराव, पर्यवेक्षक चांगदेव होलगुंडे, इकोग्राम डिजिटल स्किल फौंडेशनचे अध्यक्ष बापुसाहेब काळे, लोकसेवा पतसंस्थेच्या अध्यक्षा नलिनी काळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक मुक्ताजी बिडगर, श्रीपती तळोले, पतसंस्थेचे संचालक जालिंदर जाधव, अर्थव दुर्गावळे, मयूर ओतारी, गणेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
अॅड. कदम म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी आणि त्याचा प्रत्यक्ष शैक्षणिक वापर करता यावा, या उद्देशाने विद्यालयात एआय इनोव्हेशन लॅब सुरू करण्यात आली आहे. एआयच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ माहिती मिळविण्यापेक्षा तिचा योग्य वापर, विश्लेषण, समस्या सोडविण्याची क्षमता आणि सर्जनशील विचार विकसित करण्याची संधी मिळणार आहे.
आजच्या स्पर्धात्मक युगात पारंपरिक शिक्षणासोबत तंत्रज्ञानाधारित शिक्षणालाही तितकेच महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी उपलब्ध असलेल्या आधुनिक साधनांचा योग्य आणि जबाबदारीने वापर करून ज्ञान, कौशल्य, कल्पकता आणि नवोन्मेषाची क्षमता विकसित करावी, असेही त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विद्यालयात सुरू करण्यात आलेली एआय लॅब महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाधारित शिक्षणाची नवी दिशा मिळणार असून, ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ही एआय लॅब निश्चितच मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास अँड. कदम यांनी व्यक्त केला.
विद्यालयाचे प्राचार्य बी. के. भालेराव यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अविनाश कामथे व एन. बी. मुल्ला यांनी केले, तर मोहीनी शिंदे यांनी आभार मानले.
काळे उभयतांचा विशेष सन्मान…
विद्यालयातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची सुविधा मिळावी, या उद्देशाने इकोग्राम डिजिटल स्किल फौंडेशनचे अध्यक्ष बापुसाहेब काळे व लोकसेवा पतसंस्थेच्या अध्यक्षा नलिनी काळे या दाम्पत्याने सुमारे ४० हजार रुपये खर्च करून डिजिटल क्लासरूम तयार करून दिली. त्यांच्या या सामाजिक व शैक्षणिक योगदानाबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव अॅड. संदिप कदम यांच्या हस्ते काळे दाम्पत्याचा विशेष सत्कार करण्यात आला.





