AIमुळे वीज निर्मिती वाढण्यास मदत होण्याची शक्यता

नवी दिल्ली – सध्या जग शाश्वत विकासासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी कमी उत्सर्जन करणारा इंधनपुरवठा वाढण्याची गरज आहे. कृत्रीम बुद्धिमत्ता म्हणजे एआय तंत्रज्ञान वीज निर्मिती आणि इंधन निर्मिती वाढविण्यासाठी काही प्रमाणात उपयोगी ठरण्याची शक्यता असल्याचे हनीवेल या कंपनीचे अध्यक्ष अनंत माहेश्वरी यांनी म्हटले आहे.
एआय मधील डेटा आणि मशीन लर्निंग या तंत्रज्ञानाचा वापर करून आहे त्या स्त्रोतांतून सध्या जेवढी वीज निर्माण होते त्यापेक्षा जास्त वीज निर्माण करण्याच्या शक्यता पडताळून पाहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असाच प्रकार इतर इंधनाच्या बाबतीतही होऊ शकतो. या विषयावर जगभरातील विविध प्रयोगशाळांमध्ये चिंतन चालू असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या वीज आणि इंधन निर्माण करताना बरीच ऊर्जा लागते. त्या ऊर्जेचा वापर कमी होण्याची गरज आहे. त्याचबरोबर निर्माण झालेली वीज आणि इंधन वाहून नेण्यासाठी बराच खर्च होतो. हा खर्च विविध तंत्रज्ञानाचा वापर करून कमी केला जाऊ शकतो. यासाठी कृत्रीम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाची मदत घेतली जाऊ शकते.
सध्या ऊर्जा निर्मिती कशी व्हावी आणि ती कशी वाहून नेली जावी या पद्धतीत बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे. तो बदल कृत्रीम बुद्धिमत्ता दाखवून देईल. तेल शुद्धीकरण कारखान्यात कृत्रीम बुद्धिमत्तेचा वापर केल्यानंतर या प्रकल्पाची क्षमता वाढू शकते. त्याचबरोबर या ठिकाणी पूर्वी जास्त अनुभवाचे मनुष्यबळ लागत होते. आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून कमी मनुष्यबळाचा वापर केला जाऊ शकतो असे त्यांनी सांगितले.





