AI Crime : एआयचा गैरवापर! पबजीवर ओळख, प्रेम नाकारल्याने तरुणीचे अश्लील फोटो नातेवाईकांना पाठवले

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – गेमिंग प्लॅटफॉर्मवर ओळख झालेल्या तरुणीला सोशल मीडियावर फॉलो करून तिच्याकडे प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी केली. तरुणीने नकार दिला असता एआय द्वारे तिचे अश्लील फोटो बनवून ते तिच्या नातेवाईक आणि मित्रांना पाठवून बदनामी केली. याप्रकरणी बावधन पोलिसांनी आरोपी तरुणाला कर्जतमधून अटक केली आहे.चिराग राजेंद्र थापा (वय २१, रा. विरार पूर्व, मुंबई) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित तरुणी बीजीएमआय (पबजी) ही गेम ऑनलाइन खेळत होती.
१५ दिवसांपूर्वी गेम खेळत असताना तिची आणि आरोपीची ओळख झाली. त्यानंतर ते एकमेकांशी गेममधील व्हॉइस चॅटद्वारे बोलत होते. गेमिंग सेशननंतर आरोपीने पीडित तरुणीच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिला मेसेज केले. मागील आठवड्यात चिरागने पीडित तरुणीकडे प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी केली. मात्र आपण कधीही भेटलो नाही, एकमेकांबद्दल माहिती नाही या कारणामुळे तरुणीने त्याला स्पष्ट नकार दिला.
हा नकार चिरागला चांगलाच झोंबला आणि त्याने सोशल मीडियावर तरुणीचे १३ पेक्षा अधिक प्रोफाइल्स तयार केले. त्याद्वारे तरुणीला धमक्या देऊ लागला. मात्र तरुणीने तिथेही त्याला जुमानले नाही. त्यामुळे चिरागने एआयच्या मदतीने तरुणीचे नग्न फोटो तयार केले. ते फोटो तरुणी, तिचे कुटुंबीय आणि मित्रांना सोशल मीडिया अकाउंटवर पाठवले. चिरागने तरुणीच्या सोशल मीडिया अकाउंटवर असलेल्या मैत्रिणींचे देखील असेच फोटो तयार केले.
ते फोटो पीडित तरुणीच्या मैत्रिणींना पाठवून त्यांना धमकी दिली कि, तरुणीला त्याच्यासोबत प्रेमसंबंध ठेवण्यास भाग पाडावे. याबाबत पीडित तरुणीने बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. पोलिसांनी तांत्रिक तपास करत आरोपी चिरागला कर्जतमधून अटक केली.




