Kangana Ranaut: कंगना रनौत यांची दिल्ली हायकोर्टात धाव! नाव आणि फोटोचा गैरवापर करणारा अश्लील कंटेंट हटवण्याची मागणी
Kangana Ranaut कंगना रनौत यांच्या म्हणण्यानुसार, डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्यांच्या नावाचा आणि ओळखीचा परवानगीशिवाय वापर केला जात आहे. काही ठिकाणी त्यांच्या ओळखीशी संबंधित अश्लील आणि आक्षेपार्ह कंटेंटही प्रसारित होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधित कंटेंट हटवण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी कंगना यांनी याचिकेद्वारे केली आहे.

Kangana Ranaut: बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपच्या खासदार कंगना रनौत पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. यावेळी त्यांच्या चर्चेत येण्याचं कारण म्हणजे सोशल मीडियावर त्यांच्या नावाचा, फोटोचा आणि ओळखीचा कथित गैरवापर. इंटरनेटवर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) मदतीने तयार होणारे बनावट व्हिडीओ, डीपफेक आणि अश्लील कंटेंट याविरोधात कंगना यांनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित अधिकारांचं संरक्षण करावं आणि परवानगीशिवाय वापरला जाणारा आक्षेपार्ह कंटेंट हटवावा, अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली आहे.
कंगना यांनी न्यायालयाकडे काय मागणी केली? (Kangana Ranaut)
कंगना रनौत यांच्या म्हणण्यानुसार, डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्यांच्या नावाचा आणि ओळखीचा परवानगीशिवाय वापर केला जात आहे. काही ठिकाणी त्यांच्या ओळखीशी संबंधित अश्लील आणि आक्षेपार्ह कंटेंटही प्रसारित होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधित कंटेंट हटवण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी कंगना यांनी याचिकेद्वारे केली आहे.
तसंच, त्यांच्या नावाचा, प्रतिमेचा आणि ओळखीचा चुकीच्या पद्धतीने वापर होऊ नये, यासाठी कायदेशीर संरक्षण मिळावं, अशीही त्यांची भूमिका आहे. सोशल मीडियावर AI च्या मदतीने बनावट फोटो आणि व्हिडीओ तयार करण्याच्या घटना वाढत असताना हा मुद्दा महत्त्वाचा ठरत आहे.
दिल्ली हायकोर्टाने काय दिले आदेश? (Kangana Ranaut)
कंगना यांच्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टाचे न्यायमूर्ती विकास महाजन यांच्या एकलपीठाने संबंधित पक्षांना समन्स जारी केले आहेत. तसेच, आक्षेपार्ह कंटेंट हटवण्यासाठी अंतरिम दिलासा देण्याच्या मागणीवर न्यायालयाने नोटीस बजावली आहे. सुनावणीदरम्यान कंगना यांच्या वकिलांनी सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अश्लील आणि आक्षेपार्ह पोस्टचा मुद्दा उपस्थित केला. असा कंटेंट हटवण्याचे आदेश देण्याची मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली.
यावर न्यायालयाने कोणत्या पक्षांविरोधात कंटेंट हटवण्याचे आदेश मागितले आहेत, त्यांची नावं स्पष्ट करण्यास सांगितलं. याशिवाय, काही पक्षांना प्रकरणातून वगळल्यानंतर सुधारित पक्षकारांची यादी सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ फेब्रुवारी २०२७ रोजी होणार आहे. मात्र, न्यायालयाने आक्षेपार्ह कंटेंट हटवण्याबाबत अंतिम निर्णय दिलेला नसून, सध्या याचिकेवरील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

Kangana Ranaut: कंगना रनौत यांची दिल्ली हायकोर्टात धाव! नाव आणि फोटोचा गैरवापर करणारा अश्लील कंटेंट हटवण्याची मागणी
पर्सनॅलिटी राइट्स म्हणजे नेमकं काय? (Kangana Ranaut)
पर्सनॅलिटी राइट्स म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या नावाचा, फोटोचा, आवाजाचा, प्रतिमेचा किंवा ओळखीशी संबंधित वैशिष्ट्यांचा वापर करण्याबाबत असलेले अधिकार. विशेषतः प्रसिद्ध व्यक्तींच्या ओळखीचा वापर जाहिराती, व्यावसायिक उपक्रम किंवा डिजिटल कंटेंटमध्ये त्यांच्या परवानगीशिवाय केला जात असल्यास हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो.
AI तंत्रज्ञानामुळे एखाद्या व्यक्तीचा चेहरा दुसऱ्या व्हिडीओमध्ये दाखवणे, बनावट आवाज तयार करणे किंवा खोटे प्रसंग खरे असल्याप्रमाणे सादर करणे शक्य झालं आहे. अशा प्रकारांमुळे संबंधित व्यक्तीची प्रतिष्ठा, गोपनीयता आणि ओळख यांच्याशी संबंधित प्रश्न निर्माण होतात.
अनेक सेलिब्रिटींनी घेतली न्यायालयाची मदत (Kangana Ranaut)
कंगना रनौत यांच्याआधी अभिनेत्री जान्हवी कपूर यांनीही व्यक्तिमत्त्वाच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. याशिवाय, माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि सुनील गावस्कर, अभिनेता अर्जुन कपूर, अल्लू अर्जुन, नागार्जुन, वरुण धवन, काजोल, ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यासह अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी आपल्या ओळखीच्या गैरवापराविरोधात कायदेशीर संरक्षण मागितलं आहे.
गायक जुबिन नौटियाल, चित्रपट निर्माता करण जोहर, आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर आणि खासदार शशी थरूर यांच्यासारख्या व्यक्तींनीही या विषयावर न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. एकूणच, डिजिटल माध्यमांवर AI चा वाढता वापर आणि डीपफेक कंटेंटमुळे प्रसिद्ध व्यक्तींच्या ओळखीच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता कंगना रनौत यांच्या याचिकेवर न्यायालय पुढे काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागलं आहे.





