परिसरात बिबट्या असल्याची झटपट माहिती मिळणार; शिरूर तालुक्यात AI सायरन अलर्ट सुरू

जांबूत : शिरूर तालुक्यासह बेट भागात गेल्या काही वर्षांपासून बिबट्याच्या हल्ल्यांनी उच्छाद मांडला आहे. या हल्ल्यांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला असून पशुधनाचाही मोठ्या प्रमाणात नाश झाला आहे. शिरूर, आंबेगाव, जुन्नर आणि खेड तालुके बिबट्याप्रवण क्षेत्र म्हणून घोषित झाले असून, गेल्या पाच वर्षांत येथे अनेक बळी गेले आहेत.
बिबट्याच्या भीतीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. या पार्श्वभूमीवर, मानव-बिबट्या संघर्ष कमी करण्यासाठी शिरूर तालुक्यातील बारा अतिसंवेदनशील गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित अलर्ट सिस्टीम प्रायोगिक तत्त्वावर बसविण्यात आली आहे.
या अत्याधुनिक प्रणालीद्वारे बिबट्याच्या हालचाली आणि त्याच्या शरीरावरील पॅटर्न ओळखून सायरनद्वारे सतर्कतेचा इशारा दिला जाणार आहे. यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना बिबट्याच्या उपस्थितीची तात्काळ माहिती मिळेल आणि संभाव्य हल्ले टाळण्यास मदत होईल. ही अलर्ट सिस्टीम पिंपरखेड, जांबूत, मांडवगण फराटा येथील पिंपळमळा, फराटेवाडी, शिवनगर, इनामगाव, फिरंगीमळा, पिंपळसूटी, घायतडक वस्ती, करडे, आण्णापूर, संगमवाडी, म्हसे बुद्रुक, आमदाबाद आणि निमगाव दुडे या ठिकाणी बसविण्यात आली आहे.
सदर उपक्रम जुन्नरचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे आणि सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे आणि वनविभागातील कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे राबविला आहे. या AI-आधारित प्रणालीमुळे बिबट्याच्या धोक्यापासून नागरिकांचे संरक्षण होण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.





