अहमदनगर – चुकीच्या गर्भपातामुळे महिलेचा मृत्यू

राजूर – वैद्यकीय अधिकार नसताना एका डॉक्टरने अकोले तालुक्यातील आदिवासी भागात राहणाऱ्या तरुण महिलेचा चुकीचा गर्भपात केल्याने मृत्यू झाला. या प्रकरणी डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अकोल्यातील एका दुसऱ्या डॉक्टरचीदेखील चौकशी करण्यात आली आहे. या प्रकाराने राजूर परिसरात खळबळ उडाली आहे.
डॉ. बाबासाहेब गोडगे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे. सीताबाई संदीप तळपे (वय 24, रा. शेणीत, ता. अकोले) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक जैनुद्दीन फजल शेख यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. सीताबाई संदीप तळपे हिला रक्तस्राव होत असल्याने तिने सायंकाळच्या सुमारास डॉक्टरांनी दिलेली गोळी घेतली आणि ती झोपी गेली. सीताबाई हिच्या नवऱ्याने तिला उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिची दातखिळ बसल्याचे लक्षात आले.
त्यामुळे तिला औषधोपचारासाठी राजूर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी औषधोपचारांपूर्वी ती मृत झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी राजूर पोलीस विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण अर्धवट गर्भपात असल्याचे उघड झालं. डॉक्टरांनी सिताबाई हिचा व्हिसेरा जपून ठेवण्याचा निर्णय घेतला होता. हा व्हिसेरा हा तपासणीकामी न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा, नाशिक येथे पाठविण्यात आलेला आहे.
सीताबाई 4 महिन्यांची गरोदर होती. मात्र, सोनोग्राफीमध्ये गर्भात दोष असल्याने गर्भपात करण्याचा वैद्यकीय सल्ला देण्यात आला होता. त्यामुळे तळपे दांपत्य डॉ. गोडगे यांच्या रुग्णालयात गेले. तिथे सीताबाई हिचा गर्भपात करण्यात आला. गर्भपात झाल्याच्या दिवशी डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यापासून सीताबाई हिला पोटदुखीचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे पुन्हा सोनोग्राफी करण्यात आली. तेव्हा गर्भपिशवीत मांसाचा तुकडा शिल्लक राहिला असल्याचं दिसून आले. डॉ. भोकनळ यांनी सीताबाई हिला औषधे देऊन घरी पाठवलं होते. मात्र, तिला रक्तस्राव सुरू होता. डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या घेऊन सीताबाई झोपून गेली आणि दुसऱ्या दिवशी ती मृत पावल्याचे आढळले.
या तपासात मृत सीताबाई तळपे हिच्यावर डॉ. बाबासाहेब गोडगे व डॉ. आबासाहेब भोकनळ यांनी केलेल्या गर्भपाताच्या उपचाराबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांचा अभिप्राय घेण्यात आला होता. त्यानुसार सीताबाईवर झालेल्या औषधोपचारांच्या चौकशीकामी आठस्तरीय समिती नेमली होती. या समितीने औषधोपचाराच्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर डॉ. गोडगे यांना गर्भपात करण्याचा अधिकार नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार अयोग्य पद्धतीने, अपूर्ण गर्भपात करून महिलेच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या डॉ. गोडगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





