अहमदनगर – रस्तालुटीतील तीन आरोपींना अटक

पाथर्डी – शेवगाव-पाथर्डी रस्त्यावर साकेगाव शिवारात एका युवकाला लुटणाऱ्या तीन आरोपींना पाथर्डी पोलिसांनी नुकतीच अटक केली. दि. १६ नोव्हेंबर रोजी दुपारी भूषण प्रकाश केदार ( ता. नेवासा) यांना तीन तरुणांनी जबरदस्तीने खिशातील पैसे मोबाईल हिसकून लुटले होते. पाथर्डी पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून तपासाची सूत्रे फिरवली. यातील एका आरोपीचे फुटेज पोलिसांना मिळून आले. त्याचा आधार घेत चेतन ऊर्फ काल्या संजय घोरपडे (रा. इंदिरानगर, पाथर्डी), सागर अंबादास मर्दाने (रा. दुलेचांदगाव), मनेष भीमसिंग परदेशी (रा. परदेशी मळा, खर्डे मळा, पाथर्डी) या तिघा आरोपींना पोलिसांनी अटक केली.
भूषण केदार दि. १६ रोजी पाथर्डीहून मोटरसायकलने शेवगावकडे जात असताना दुपारी तीनच्या सुमारास साकेगाव शिवारात लघुशंकेसाठी केदार थांबले असता, तेथे तीन अनोळखी इसम आले व केदार याला म्हणाले की, तू आमच्या शेतामध्ये लघवी का केली? असे म्हणून शिवीगाळ करून केदार यांच्याकडे दारू पिण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी केली. त्यांनतर केदार यांना बाजूच्या झाडाकडे ओढत नेले. दमदाटी करून केदार यांच्या खिशातील साडेसात हजार व मोबाईल हिराकावून घेऊन ते निघून गेले. त्यानंतर यातील आरोपी घोरपडे हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला होता.
त्याचा आधार घेत पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक जगदीश मुलगीर यांच्या पथकातील विजय काळोख, विनोद मासळकर यांनी या तिघांना पकडून अटक केली. घोरपडे याच्यावर रस्तालूट व बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले हे तरुण नशा-पाणी करण्यासाठी असे गुन्हे करतात. यातील चेतन ऊर्फ काल्या घोरपडे हा पाथर्डी-शेवगाव रोडवरील एका शेतात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस आरोपीला शेतात पाहण्यासाठी गेले असता पोलिसांना पाहताच घोरपडे पळू लागला. मात्र, पोलिसांनी त्याला शोधून ताब्यात घेतले.




