अहमदनगर – शिधा “आनंदा’चा, पदरी मात्र निराशा!

नगर – मोठा गाजावाजा करत दिवाळीप्रमाणे गणेशोत्सवातही आनंदचा शिधा आला. मात्र, सुरवातीला आनंदाच्या शिध्यातील जिनसाच्या गुणवत्तेवरून ग्राहकांची नाराजी रेशन दुकानदारांना पत्करावी लागली तर आता कमिशनसाठी हेलपाटे घालावे लागत आहेत. यामुळे आनंदाच्या शिध्याने आनंद कमी. मात्र, पदरी निराशा ही वास्तव परिस्थिती राहात आहे.
दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील 1 हजार 884 रेशन दुकानदारांचे सुमारे चार कोटी 30 रुपयांचे कमिशन शासनाकडून देण्यात आले नाही. त्यामुळे सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या घरात आनंदाचा शिधा देणाऱ्या रेशन दुकानदारांना आता आपली व्यथा कुणापुढे मांडावी असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यात 1 हजार 884 स्वस्त धान्य दुकानदार आहेत. या दुकानदारांकडून प्राधान्यक्रमातील लाभार्थ्यांना दरमहा वेळेत धान्य देण्याचे काम होत आहे.
याशिवाय राज्य व केंद्र शासनाकडून वेळोवेळी देण्यात येणारा आनंदाचा शिधा लाभार्थ्यांना वितरित करण्याची जबाबदारी या रेशन दुकानदारांवर आहे. रेशन व्यवस्थेत केंद्र व राज्य शासनाकडून ऑनलाइन प्रणाली रेशन दुकानदारांचे कमिशन वेळेत देण्याचे आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सहसचिवांनी जिल्हा पुरवठा अधिकारी व अन्न धान्य वितरण अधिकारी यांना दिले आहेत, असे असतानाही या आदेशाचे पालन प्रशासकीय यंत्रणेकडून होत नसल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात 16 हजार 500 मेट्रीक टन गहू व तांदूळ वितरित होतो. त्याबरोबर यंदा गणेशोत्सवात आनंदा शिधा याचे वाटप करण्यात आले आहे. वितरित करणाऱ्या आलेल्या या धान्यापोटी स्वस्त धान्य दुकानदारांना दोन कोटी 15 लाख कमिशन देण्यात येते. एक किलो धान्य वितरित केल्या एक रूपया 50 पैसे कमिशन देण्यात येते. जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना जुलै अखेर कमिशन देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले असून ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यांचे कमिशन देणे बाकी आहे. त्यात ऑगस्ट कमिशन लवकरच जमा होणार असल्याचे जिल्हा पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे.





