अहमदनगर – आठ दिवसांत शासनाला प्रस्ताव दाखल होणार

कर्जत – शासनाने नवीन जागेच्या नियोजित औद्योगिक वसाहतीसाठी प्रस्ताव मागितलेले आहेत. प्रथमच औद्योगिक वसाहतीसाठी जागा सुचविण्याने लोकांच्या मनात हवी आणि हव्या त्या ठिकाणी ही वसाहत होऊ शकते . त्यामुळे तरुण, तरुणींना रोजगार उपलब्ध होईल. औद्योगिक वसाहत कर्जत तालुक्यात आणि फायदा जमिनी घेणाऱ्या दलालांचा असा सावळागोंधळ नको. लोकांनी सुचविलेल्या जागेचे सर्वेक्षण लवकरात लवकर म्हणजे आठ दिवसांत पूर्ण करून घ्यावे, जेणेकरुन पुढील प्रक्रियेस विलंब लागणार नाही. एकदा नियोजित औद्योगिक वसाहतीची जागा सर्व निकष पूर्ण करत निवडली तर त्या ठिकाणी दलालांना जमिनी घेण्यास मज्जाव करू. रेडीरेकनर दराच्या ४ पट मोबदला आणि निःशुल्क १०% विकसित भूखंड यामुळे जमीनधारकांनाही योग्य न्याय मिळेल. त्यामुळे जमिनी दलालांना विकू नका, असे आवाहन आ. राम शिंदे यांनी केले.
नियोजित औद्योगिक वसाहत, कर्जत या महत्त्वाच्या विषयाच्या अनुषंगाने तहसिल कार्यालयात आमदार प्रा. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. बैठकीसाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी गवळी यांनी नियोजित जागेसाठीचे निकष कसे असतील, याबाबत माहिती सांगितली. याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष शेखर खरमरे, काकासाहेब तापकीर, अशोक खेडकर, काका धांडे, नेटके मेजर, सोमनाथ शिंदे, शबनम शेख, प्रकाश शिंदे, सुनील यादव, गणेश क्षीरसागर, गणेश पालवे, पप्पू धोदाड, अनिल गदादे, पप्पू धुमाळ, रानमाळराणे, राहुल निंबोरे, बंटी यादव उपस्थित होते. या बैठकीचे नियोजन प्रांताधिकारी यांनी केले.
याप्रसंगी औद्योगिक महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी गवळी, कर्जत तहसिलदार, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, कार्यकारी अभियंता कुकडी विभाग, वन्यजीव व प्रादेशिक वनविभाग अधिकारी, भूमि अभिलेख अधिकारी उपस्थित होते. आमदार शिंदे म्हणाले की, प्रस्तावित औद्योगिक वसाहत कर्जत ही तेथील जागेला असलेला शेतकऱ्यांचा विरोध आणि ईडीच्या कारवाईमुळे देशातून परांगदा झालेला निरव मोदी यांची असलेली वादग्रस्त जमीन, इको सेन्सिटीव्ह झोन संदर्भातील काही प्रश्न, वनविभागाचे ना हरकत, प्रस्तावित जमिनीची सलगता नसणे व अन्य काही त्रुटींमुळे तेथील प्रस्ताव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने नाकारले आहेत.
उपस्थितांनी सुचविलेली सहा ठिकाणे :
प्रामुख्याने कोंभळी, चिंचोली रमजान परिसर, थेरगाव राष्ट्रीय महामार्ग लगत, वालवड सुपे परिसर, अळसुंदा, कोर्टी परिसर, शेती महामंडळा शेजारी, पठारवाडी, देऊळवाडी, दगडी बारडगाव हा परिसर.





