अहमदनगर – योजना पूर्ण झाल्याशिवाय ग्रामपंचायतीच्या ताब्यात देऊ नये

श्रीरामपूर – जलजीवन मिशन योजनेच्या कामात अनेक त्रुटी दिसून आल्याने आमदार लहू कानडे यांनी अधिकारी, ग्रामसेवक व ठेकेदारांची झाडाझडती घेतली. वाढीव अंदाजपत्रकासह योजना पूर्ण झाल्याशिवाय ती ग्रामपंचायतीच्या ताब्यात देऊ नये, अशी सूचना त्यांनी केली.
आ.कानडे यांनी पंचायत समितीच्या सभागृहात श्रीरामपूर तालुक्यात सुरू असलेल्या जलजीवन मिशन योजनेच्या कामांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत योजनेच्या कामात अनेक त्रुटी दिसून आल्याने आ.कानडे यांनी संबंधित अधिकारी, ग्रामसेवक व ठेकेदारांना धारेवर धरले. जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, जीवन प्राधिकरण विभागाचे उपअभियंता गायकवाड, पंचायत समितीचे रविंद्र पिसे आदी उपस्थित होते.
या योजनेची अंमलबजावणी जशी व्हायला पाहिजे तशी होत नाही. कारेगावच्या योजनेचे काम पूर्ण न होताच योजना हस्तांतरित करून ठेकेदारांना पैसे अदा केले गेले. कोणाच्या दबावाखाली हे काम केले. ही घाई कशासाठी केली, असा प्रश्न करून या गावाची ग्रामसभा बोलवावी, तसे मला अवगत करावे, आपण प्रत्यक्ष पाहणी करू, असे आ. कानडे म्हणाले. यावेळी अनुपस्थित ग्रामसेवकास नोटीस पाठवून केलेल्या कारवाईची माहिती देण्याचे त्यांनी श्री. सिनारे यांना सुचविले.
भोकर येथे ४ पाणी टाक्या बांधूनही १० वर्षे गावाला पाणी मिळाले नाही. त्या योजनेत या टाक्या बाद करून नवीन टाक्या केल्या. जुन्या टाक्यांचा खर्च कोणाकडून वसूल करायचा, योजना केवळ ठेकेदारांसाठी आहेत काय, अशा ठेकेदारांवर फौजदारी कारवाई केली पाहिजे होती, हा पैसा जनतेचा आहे , तो चोरांच्या खिशात घालायला दिला काय, असा सवाल करून ज्या ज्या ठिकाणी सब ठेकेदार नेमले याची माहिती द्यावी, असे ते म्हणाले. गावातील सर्व घरांना पाणी मिळाल्यानंतर योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात यावी, असा उल्लेख निविदेत असल्याने वाढीव अंदाजपत्रकासह योजना पूर्ण झाल्यानंतरच ती हस्तांतरीत करावी, नागरिकांनी याबाबत दक्षता घ्यावी, अधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घ्यावी.
यावेळी सरपंच अशोक भोसले, डॉ. नितीन आसने, मुरली राऊत यांनी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी सरपंच अशोक भोसले, डॉ. नितीन आसने, मुरली राऊत, सागर मुठे, सुरेश पवार, हरिभाऊ बनसोडे, अविनाश पवार, अजिंक्य उंडे, प्रताप पटारे, सचिन मुरकुटे, अभिषेक खंडागळे, भागचंद नावगिरे, अतुल खरात, राजेंद्र ओहोळ, प्रेम कुंकुलोळ, प्रसाद खरात, राजेंद्र थोरात, चंद्रसेन लांडे यांच्यासह ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.
वितरिकांमुळे रस्त्यांची लागतेय वाट
योजनेच्या वितरकांमुळे रस्ते खोदले जाणार असल्याने चांगल्या रस्त्यांची वाट लागणार असल्याचे आपण अधिवेशन काळात पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले असता त्यांनी अशा कामांचे प्रस्ताव सादर करण्याचे सूचित केले आहे. त्यानुसार प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन आ.कानडे यांनी यावेळी केले.





