अहमदनगर – संजीवनी कॉलेजच्या पाच अभियंत्यांची नोकरीसाठी निवड

कोपरगाव – दरवर्षी संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या अंतिम वर्षाचे सत्र सुरू झाले की, कॉलेजचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपार्टमेंट नामांकित कंपन्यांच्या मानव संसाधन विभागास कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह घेण्यासाठी पाचारण करते. यानुसार अलिकडेच आयटी व कॉम्प्युटर क्षेत्रातील पाच कंपन्यांनी कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत मुलाखती घेतल्या. एकूण पाच नवोदित अभियंत्यांची नोकरीसाठी निवड करून त्यांना सुरुवातीस वार्षिक पॅकेज ४. ५ लाखांपर्यंत देण्यात आले.
नेटविन कंपनीने आयटी विभागाच्या संकेत चंद्रभान शेळके याची निवड केली आहे. फोसिअल वर्क्स सोल्युशन्स कंपनी व मायपकोट इन्फोटेक कंपनी या दोनही कंपन्यांनी आयटी विभागातील संकेत श्रीराम दवंगे याची निवड केली आहे. करमॅक्टस सिस्टिम कंपनीने कॉम्प्युटर इंजिनिअहाग विभागातील प्रतिक प्रकाश सोनार याची निवड केली आहे तर विंजित टेक्नॉलॉजिस या कंपनीने कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील आदित्य नितिन ढोले व हर्षालीनी बाळू पांढरे यांची निवड केली आहे. यानंतर अनेक कंपन्यांचा ड्राईव्ह नियोजित असून, मागील वर्षांचा नोकरी दिलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येचा आकडा व मागील वर्षाचे उच्चांकी पॅकेज या दोनही बाबी चालूवर्षी अधिक असण्यासाठी व्यवस्थापन, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपार्टमेंट व सर्व विभाग प्रयत्नशील आहे.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिन कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेले नवोदित अभियंते, त्यांचे पालक तसेच डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे डीन डॉ. विशाल तिडके, विभागप्रमुख डॉ. धनंजय क्षीरसागर व डॉ. माधुरी जावळे यांचे अभिनंदन केले आहे.





