अहमदनगर – दगाफटका झाला तरी आंदोलन चालू ठेवा

नगर – मराठे कोणाला घाबरत नाहीत, हे दाखवून देण्याची वेळ आता आली आहे. तुमच्यात एकी नाही, असे ते म्हणत होते. मात्र आता मराठा समाज एकवटला असून जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. सरकारने कोणताही डाव टाकला तरीही तो आता यशस्वी होऊ देणार नाही. तुमच्या आशीर्वादाच्या बळावरच मी मुंबईला चाललो असून परत येईन की नाही, हे माहीत नाही. मला दगाफटका झाला तरीही तुम्ही आरक्षणाचे आंदोलन चालू ठेवा, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे निघालेली पदयात्रा रविवारी (दि. २१) जानेवारी) अहमदनगरमध्ये आली. या पदयात्रेचा रात्रीचा मुक्काम बाराबाभळी येथे होता. यावेळी रात्री साडेबारा नंतर येथे मनोज जरांगे पाटील यांची सभा झाली. या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी लाखो मराठा बांधवांचा समुदाय उपस्थित होता.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, आपल्या मतांच्या जिवावर यांनी राजकारण केले. आता आरक्षण दिले नाही तर यांना सळो की पळो करून सोडा व त्यांना त्यांची जागा दाखवून द्या. तेवीस दिवस मी उपोषण केले असल्याने सध्या माझी तब्बेत बरी नाही. माझे संपूर्ण आयुष्य मी समाजासाठी घालवणार आहे. आता आरक्षण मिळाल्याशिवाय मी माघार घेणार नाही, असे ते म्हणाले.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे निघालेली पदयात्रा रविवारी (दि.२१) अहमदनगरमध्ये आली. या पदयात्रेच्या रात्रीचा मुक्काम बाराबाभळी येथे होता. बाराबाभळी येथे दीडशे एकरवर मुक्कामाची व्यवस्था होती. त्यापैकी ८५ एकर जागा ही मदरशाची आहे. जागा उपलब्ध करून देण्यासोबतच मदरशातील साडेतीनशे विद्यार्थ्यांनीही सेवा दिली. याशिवाय परिसरात भगवे झेंडे लावण्यासाठीही परवानगी देण्यात आली होती. मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील व त्यांना साथ देणाऱ्या सर्वांचे जामिया मुहम्मदीया मदरसा यांच्यातर्फे स्वागत करणारा फलकही लावण्यात आला होता.
मनोज जरांगे यांना कुराणची प्रत भेट
मनोज जरांगे पाटील व सर्व मराठा समाज बांधवांची अत्यंत व्यवस्थित अशी सोय मदरशामध्ये करण्यात आली होती. एकतेचा, सामाजिक एकोप्याचा संदेश या वेळी संपूर्ण राज्यात पोहोचला आहे. यावेळी मनोज जरांगे यांना मदरशाच्या विश्वस्तांनी मराठी कुराणची प्रत भेट दिली. तसेच पदयात्रेत महिलाही सहभागी आहेत. बाहेर थंडी असल्याने मदरशातील वसतिगृहामध्ये एक हजार महिलांची झोपण्याची व्यवस्था केली गेली होती. रविवारी रात्री मराठा बांधवांनी याच मैदानावर भोजनही घेतले. मदरशातील विद्यार्थ्यांनी मनोभावे सेवा दिली.
श्रीराम उत्सव साजरा
आज देशभरात अयोध्यातील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा केला जात आहे. दरम्यान, आम्ही देखील या उत्साहात सहभागी होणार असल्याचे जरांगे म्हणाले. आमच्या पायी दिंडीत आम्ही हा आनंद साजरा करणार असल्याचे जरांगे म्हणाले. आम्ही देखील रामभक्त असून, आम्हाला देखील याचा आनंद आहे. मात्र, सोबतच आमच्या लेकरांच्या आयुष्यासाठी आरक्षणाचा मुद्दा देखील तेवढाच महत्वाचा असल्याचे जरांगे म्हणाले.
आ. जगताप यांकडून अल्पोपहार, फलाहार, पाण्याची व्यवस्था
मनोज जरांगे पाटील हे नगरमध्ये दाखल होताच आ.संग्राम जगताप यांनी देखील त्यांचे स्वागत केले. सोमवारी (दि.२२ ) मराठा पायी मोर्चाने नगर शहरातून मुंबईकडे कूच केली. त्यांच्या जंगी स्वागताची तयारी आमदार संग्राम जगताप यांनी केली होती. मराठा मोर्चेकरांसाठी अल्पोपहार, फलाहार, पाण्याची व्यवस्था केली. गर्दीची काळजी घेऊन शहरामध्ये ६ ठिकाणी प्रशस्त मंडप टाकले होते. स्टेटबँक चौक, चांदणी चौक, एडीसीसी बँक, अरुणोदय हॉस्पिटल, राजयोग हॉटेल, आमदार संग्राम जगताप यांचे कार्यालय आदी ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती.
आ. संग्राम जगताप यांनी जरांगे पाटीलांचे केले स्वागत
लाखोंच्या मराठा बांधवांसह मनोज जरांगे शहरात दाखल होताच आ. संग्राम जगताप कोठी रोडवरील पाटील हाॅस्पीटल जवळ सहभागी झाले. त्यांनी मनोज जरांगे यांचा पुष्पहार घालून स्वागत केले. संग्राम जगताप मोर्चात सहभागी होताच तरुणांनी त्यांना उचलून घेत नृत्य केले. त्यांनीही डीजेच्या ठेक्यावर नृत्य केले. त्यानंतर रॅली पुढे येताच
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आ. जगताप व मनोज जरांगे यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.





