Police Bribe: 10 हजाराची लाच स्वीकारताना दोन पोलीस अटक; बसस्थानकाजवळ सापळा रचून पकडले

अहमदनगर – भावा-भावाच्या वादात एका भावाला मदत करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोन पोलिसांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात अटक केली. पोलीस हवालदार सुनिल वाकचौरे व पोलीस शिपाई गणेश ठोकळ (श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. ही कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली.
तक्रारदार व त्यांच्या भावात घराची भिंत बांधण्यावरून आपसात वाद सुरु होता. यावेळी तक्रारदारास त्याठिकाणी भिंत बांधण्यास तसेच सहकार्य करण्यासाठी वाघचौरे आणि ठोकळ यांनी पंधरा हजार रुपयाची लाच मागितली. तडजोडीअंती दहा हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी याबाबत नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार नाशिक येथील पथकाने सापळा रचून दोघा लाचखोर पोलिसांना श्रीरामपूर बस स्थानकाजवळ पैसे घेताना पकडले.
दोन्ही कर्मचारींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकण्याची सहा महिन्यातील ही तिसरी घटना असून एकूण चार कर्मचारी या सहा महिन्यात लाच घेताना पकडले गेले. त्यामध्ये पोलीस हवालदार काळे, पोलीस नाईक दुधाडे व आता अडकलेले सुनिल वाकचौरे, गणेश ठोकळ यांचा समावेश आहे.





