अहमदनगर – मुजोर वाळूतस्करांना बसणार वेसण..!

शंकर दुपारगुडे
कोपरगाव – तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळूउपसा करून वाळूतस्करांनी पोलीस, महसूलच्या अधिकाऱ्यांवर दादागिरी निर्माण करून वाळूतस्करीचा धंदा जोरात सुरू आहे. त्यामुळे तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी वाळूतस्करांवर करडी नजर ठेवली असून, यापुढे तालुक्यातील ज्या भागात वाळू अधिक प्रमाणात आहे, त्या ठिकाणी बैठे पथकांची नियुक्ती केल्याने वाळूतस्करांची धावपळ होणार आहे. तसेच येत्या आठ दिवसांत केवळ सहाशे रुपयांत एक ब्रास वाळू देणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महसूल विभाग वाळूतस्करांवर करडी नजर ठेवून ज्या ठिकाणी बेकायदा वाळूउपसा करताना अथवा वाळू वाहतूक करताना, तसेच अवैध वाळूसाठा आढळला तर पाचपट दंड ठोकून संबंधितांवर शासकीय नियमानुसार कारवाई करून वाळू वाहतुकीत वापरलेले वाहन जप्त करणार असल्याची माहिती तहसीलदार संदीप कुमार भोसले यांनी दै. प्रभातशी बोलताना दिली.
ते पुढे म्हणाले की, तालुक्यातील सुरेगाव व माहेगाव देशमुख या ठिकाणच्या नदीपात्रातून वाळूचा लिलाव करण्यात आला असून, मुंबई येथील ठेकेदार केतन भानुशाली यांना अंदाजे 20 हजार ब्रास वाळूउपशाचा ठेका देण्यात आला आहे. लवकरच कुंभारी येथील वाळुचा लिलाव केला जाणार आहे.
20 हजार ब्रास उपसलेली ही वाळू केवळ सहाशे रुपये ब्रासने नागरिकांना दिली जाणार आहे. पुढील वाहतुकीचा खर्च संबंधित नागरिकांनी करावयाचा आहे. दरम्यान, तालुक्यातील चांदगव्हाण, माहेगाव, सुरेगाव, कुंभारी धारणगाव,येथून बेकायदा वाळूउपसा होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.
वाढती वाळूतस्करी थांबवण्यासाठी तहसीलदार भोसले यांनी दोन बैठे पथक निर्माण केले आहेत. त्या पथकामध्ये महसुली विभागाचे मंडलाधिकारी, तलाठी व कोतवाल यांचा समावेश असणार आहे. सात दिवस हे पथक विविध ठिकाणी सकाळी सहा ते सायंकाळी सहापर्यंत ठिय्या मांडून वाळूतस्करांवर नजर ठेवणार आहे. या दरम्यान जो सापडेल त्याच्यावर कारवाई करणार आहेत. या पथकांच्या जोडीला काही भरारी पथके तयारी केली असून, त्या मार्फत दिवस-रात्र फिरता पहारा ठेवला जाणार आहे. बेकायदा वाळू जिथे दिसेल तिथे कारवाई करणार आहे.
तहसीलदारांच्या निर्णयाकडे लक्ष
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गेल्या अनेक महिन्यांपूर्वी सहाशे रुपये ब्रासने वाळू देण्याचे जाहीर केले असले, तरीही त्यांच्याच या निर्णयाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. वाळूतस्कर अव्वाच्या सव्वा भावाने वाळूविक्री करत असून, एकप्रकारे जनतेची लूट करत आहेत. त्यामुळे येत्या आठ दिवसांत सहाशे रुपयांत वाळू मिळणार का, याकडे कोपरगाकरांचे लक्ष लागले आहे.





