अहमदनगर : कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

संगमनेर – येथील कसाईवाडा परिसरात नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने आज (बुधवार) सकाळीच कारवाई केली असून, टाकलेल्या छाप्यात सहाशे किलो गोवंशाच्या मांसासह एक लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई बुधवारी (ता.6) सकाळी साडेसातच्या सुमारास करण्यात आली. गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दत्तात्रय गव्हाणे, पोलीस नाईक सचिन अडबल, पोलीस शिपाई आकाश काळे, मच्छिंद्र बर्डे व अमृत आढाव यांच्या पथकाली शहरालगतच्या कसाईवाडा परिसरात गोवंशाची कत्तल सुरु असल्याची माहिती मिळाली. या पथकाने बकर कसाब मशिदीजवळील परिसरात छापा घातला. पथकाने पाठलाग करीत दोघांना पकडले.
यावेळी परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी गोवंशाची कत्तल करून त्याचे मांस गोळा करून ठेवल्याचे दिसून आल्यानंतर पथकाने ते जप्त करुन त्याची कायदेशीर विल्हेवाट लावली. पथकाच्या हाती लागलेल्या शफिक महंमद कुरेशी (वय ३२, गल्ली नं. ९, जमजम कॉलनी) व शहबाज गुलफाम कुरेशी (वय ३२, रा. मोगलपुरा) यांच्याकडे अधिक चौकशी करता त्यांनी पळून गेलेल्या मुजाहित ऊर्फ मुज्जू दौला कुरेशी, हारुण सुल्तान कुरेशी, कलीम जलील कुरेशी, शाहीद इशाद कुरेशी, उमर शकूर कुरेशी व खलील बुढण कुरेशी (सर्व रा. मोगलपुरा) यांची नावे सांगितली. या प्रकरणी पो. ना. सचिन अडबल यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी वरील आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.





