अहमदनगर। पावसाने कपाशीचे प्रचंड नुकसान, शेतकरी हवालदिल

श्रीरामपूर – अतिवृष्टीने श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील सोयाबीन, कपाशी फळबागांसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आमदार लहू कानडे यांनी आज केसापूर येथे भेट देऊन पावसाने नुकसान झालेल्या कपाशी पिकाची पाहणी केली.
काही दिवसांपासून श्रीरामपूर-राहुरी विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. या पावसाने काढणीला आलेल्या सोयाबीनसह कपाशी, फळबागा व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. या नुकसानीची शासनाकडून भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर आ. कानडे यांनी आज केसापूर (ता. राहुरी) येथील शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. यावेळी सोयाबीन व कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आढळून आले. नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करावेत, असे पत्र आपण श्रीरामपूर व राहुरी तालुक्याचे तहसीलदार तसेच तालुका कृषी अधिकारी यांना दिले असल्याचे सांगून आ. कानडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पंचनामे करण्याच्या सूचना केल्या. यावेळी तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष अरुण पाटील नाईक, दीपक कदम आदींसह शेतकरी उपस्थित होते.





