अहमदनगर – मराठा आरक्षणा पदयात्रासाठी मोठा पोलीस बंदोबस्त

नगर – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी लाखो समाज बांधवांच्या उपस्थितीत सुरू केलेली पदयात्रा अंतरवली सराटी येथून मुंबईकडे मार्गस्थ झाली आहे. ही पदयात्रा आज रविवार (दि.21) रोजी नगर जिल्ह्यात येत आहे. जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यापासून ते नगर शहर व पुढे सुपामार्गे ही यात्रा जिल्ह्यात 130 किलोमीटर अंतर कापत पुणे जिल्ह्याकडे रवाना होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासनाने 144 अधिकारी व 1 हजार 277 कर्मचारी, तसेच आरसीपी, क्यूआरटी, एसआरपीएफ, सीआयएसएफ, बीडीडीएसची आठ पथके, 37 वाहने असा मोठा पोलीस बंदोबस्त यात्रा मार्गावर तैनात केला आहे.
जरांगे पाटलांची पदयात्रा आज तनपुरेवाडी मीडसांगवीमार्गे नगर जिल्ह्यात येत आहे. करंजी घाटमार्गे नगर शहराजवळ बाराबाभळी येथे 55 एकर क्षेत्रामध्ये ही यात्रा मुक्काम करणार आहे. तेथून उद्या (दि.22) रोजी सकाळी ही यात्रा भिंगार नगर शहरमार्गे पुणे महामार्गावरून सुप्याकडे रवाना होणार आहे. तेथे दुपारी सहभागी आंदोलकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तेथून दुपारनंतर ही यात्रा शिरूर बायपास मार्गे रांजणगावकडे रवाना होणार आहे. या यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. पदयात्रा मार्गावर काही ठिकाणी फिक्स पॉईंटही उभारण्यात येणार आहेत.
ज्या मार्गावरून यात्रा जाणार आहे, त्या मार्गावरील वाहतूक इतर पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. नगर शहरातून पुण्याकडे ही यात्रा मार्गस्थ होणार असल्याने नगर-पुणे महामार्गावरील वाहतूकही दोन्ही बाजूंनी बंद राहण्याची शक्यता आहे. ही वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याबाबत पोलीस प्रशासनाच्या वतीने नियोजन सुरू आहे.
असा आहे पोलीस बंदोबस्त…
दोन अप्पर पोलीस अधीक्षक, 8 पोलीस उपअधीक्षक, 36 पोलीस निरीक्षक, 98 सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक, 1 हजार 184 पुरुष पोलीस कर्मचारी, 50 महिला पोलीस कर्मचारी, 43 वाहतूक शाखेचे कर्मचारी, 2 आरसीपी प्लाटून, 1 क्यूआरटी प्लाटून, 2 एसआरपीएफ कंपन्या, 1 सीआयएसएफ कंपनी, 2 बीडीडीएस पथके असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.





