Ahmednagar : हंगा जलाशयात वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा…

पारनेर (प्रतिनिधी) – पारनेर शहरातील नागरिकांची तहान भागविणारा हंगा जलाशय पूर्ण क्षमतेने भरला आहे. पारनेरकरांना वर्षभर पुरेल एवढा पाण्याचा साठा या जलाशयात सध्या उपलब्ध आहे. परंतु हंगा जलाशय शेजारी असणाऱ्या बहुतांश शेतकऱ्यांनी विविध पिकांना पाणी देण्यासाठी मोठ मोठे विद्युत मोटरीद्वारे मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा साठा उपसण्याचा कार्यक्रम जोरदार चालु केला आहे. वेळीच या शेतकऱ्यांना उपसा न करण्यास सांगीतले नाही तर पाच ते सहा महिन्यातच पारनेरकरांना पिण्याच्या पाण्याचा टंचाईचा सामना करावा लागेल.
पारनेर शहर परिसरातील पुणेवाडी, सोबलेवाडी, बुगेवाडी, डिस्कळ माथा, तराळवाडी या सर्वदूर परिसरात गणेश चतुर्थीपासुन पावसाने जोरदार हजेरी लावल्याने परिसरातील पिकांना संजीवनी व रब्बी हंगामातील पिकांना जीवदान मिळाले आहे. त्याचबरोबर शहरातील केटीवेअर, नद्या नाले, ओढे, विहिरी, तलाव, कुपनलिकामध्ये मुबलक प्रमाणात पाण्याचा साठा उपलब्ध झाला आहे.
हंगा जलाशयात देखील मोठा पाणीसाठा असला तरी शेतकऱ्यांना होत असलेल्या पाण्याच्या उपशामुळे हे पाणी सहा ते सात महिनेच राहिली. त्यामुळे संभदित पाणी पुरवठा विभागाने तातडीने दखल घेऊन या उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. पारनेर शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवठा हंगा जलाशयातून होत आहे. हंगा जलाशय पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे पारनेरकरांना पुढील वर्षभर तरी पिण्याच्या पाण्याची अडचण भासणार नाही.
नगरपंचायत पाणीपुरवठा विभागाने या पाण्याचे आताच योग्य नियोजन केले तरच हे शक्य आहे. परंतु या जलाशयात भरपूर पाणी असल्याने जलाशयाला शेजारील शेतकऱ्यांनी पिकाला पाणी देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा सुरू केला आहे.





