कोपरगाव – दुर्धर आजार किंवा अपघातामुळे आलेल्या अपंगत्वामुळे दिव्यांगांना अनंत अडचणींचा सामना करताना मानसिक आणि सामाजिक आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यामुळे ते आयुष्यभर सामान्य जीवन जगण्यासाठी संघर्ष करत असतात. अशा दिव्यांग व्यक्तींना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी, त्यांना स्वावलंबी जीवन जगण्यास मदत व्हावी, या उद्देशातून दिव्यांगांची सेवा ही ईश्वर सेवा समजून त्यांच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले. महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट, कोपरगाव येथे फेलोशिप ऑफ फिजिकली हँडीकॅप्ड, मुंबई व आ. आशुतोष काळे यांच्या सहकार्यातून कोपरगाव मतदारसंघातील दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम अवयव मोजमाप व आवश्यक साहित्य नाव नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन आ. आशुतोष काळे यांच्याहस्ते करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. काळे म्हणाले की, सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी मोफत कृत्रिम अवयव मोजमाप शिबिरांचे आयोजन करून त्यांना मोफत कृत्रिम अवयव वाटप केले आहे. यापुढील काळातही कृत्रिम अवयवापासून वंचित असणाऱ्या दिव्यांगांसाठी हे शिबीर सातत्याने सुरू राहील. दिव्यांग बांधवांना शासनाकडून मिळणारी सर्व प्रकारची मदत मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी दिली. या शिबिरात निकामी अवयव बसविण्यासाठी तंत्रशुद्ध पद्धतीने तपासणी करून कृत्रिम अवयवांचे मोजमाप करण्यात आले. दिव्यांगांना आवश्यक असणाऱ्या साहित्यांची नोंदणी करण्यात आली असून, लवकरच त्यांना कृत्रिम अवयव व साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. याप्रसंगी फेलोशिप ऑफ फिजिकली हँडीकॅप्ड मुंबईचे सदस्य, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक, मनसे दिव्यांग सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व दिव्यांग बांधव उपस्थित होते. दिव्यांगांसाठी आ. काळे आशेचा किरण कृत्रिम अवयवाबाबत ग्रामीण भागातील दिव्यांगांना फारशी माहिती नसते. आ. आशुतोष काळे यांनी काळे परिवाराचा समाजकारणाचा वारसा पुढे चालविताना मतदार संघातील दिव्यांगांसाठी सुरू केलेल्या या उपक्रमाचे समाजातील सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. या शिबिराला मतदारसंघातून दिव्यांगांचा मिळालेला प्रतिसाद पाहता दुर्दैवाने अवयव गमाविणार्या व्यक्तींचा सन्मान पुनर्स्थापित करण्यासाठी मोठी मदत होणार असून दिव्यांगांसाठी आ. आशुतोष काळे आशेचा किरण बनले आहे.