सातारा – मागण्या मान्य करा अन्यथा संप करू

वाई – अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य करण्यासाठी विस्तार अधिकारी अमर वाघ यांना निवेदन देण्यात आले. तसेच मागण्या मान्य न झाल्यस संपाचे हत्यार उपसण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशाराही निवेदनात दिला आहे.
निवेदनात म्हंटले आहे की, वेळोवेळी निवेदन देऊन तसेच लोकप्रतिनिधींच्या भेटी घेऊनही अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावर तोडगा निघत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांनी सरकारला पुन्हा संप करण्याचा इशारा दिला आहे. प्रत्येक गावात अंगणवाडी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेत अंगणवाडी सेविका कार्यरत आहे.
गावातील गरोदर, स्तनदा, ० ते ६ वर्ष मुलांच्या पोषण, आरोग्य, लसीकरण, वाढीची देखरेख गृहभेटी, पूरक पोषण आहार, आरोग्य तपासणी अशा अनेक सेवा देणाऱ्या या अंगणवाडी सेविकांच्या वाट्याला सरकारने घोर निराशाच दिली आहे. या सेवा देत असताना त्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. शासनांच्या विविध योजनांची माहितीही त्याच गावात पुरवितात, आरोग्य खात्याशी समन्वय साधून मुलांच्या आरोग्य समस्या सोडवणे, निवडणूक आयोगासाठी बीएलओ म्हणून काम करणे अशी कामे करुनही अंगणवाडी सेविकांची तुटपुंज्या मानधनाद्वारे उपेक्षाच केली आहे.
आता सरकारने मानधन न देता कमीत कमी २६ हजार रुपये वेतन द्यावे, अशी मागणी करत सेविकांनी सोमवारपासून (दि. ४) संपाचा इशारा दिला आहे. निवेदन देताना सातारा अंगणवाडी सेविका संघाचे सरचिटणीस शौकतभाई पठाण, वाई तालुकाध्यक्ष परिघा पाटील, अंगणवाडी सेविका सुगंधा कोचळे, सुनीता सावंत, सुरेखा गाढवे, रेश्मा अनिल काेचळे व सेविका माेठ्या संख्येने उपस्थित होत्या.





