अहमदनगर – जायकवाडीला पाणी सोडल्यास आंदोलन

सोनई – मुळा धरणाचे पाणी राजकीय दबावाखाली जर जायकवाडीला सोडण्यास आले तर नेवासा तालुक्याला याचा मोठा फटका बसणार आहे. जायकवाडीत पुरेसा पाणी साठा शिल्लक असताना राजकीय दबावाखाली मुळाचे पाणी जायकवाडीला सोडण्याचा घाट घातला जातो आहे. जर मुळा धरणातून खाली पाणी सोडण्याचा निर्णय झाला तर लाभधारक शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारण्याचा गर्भित इशारा आ. शंकरराव गडाख यांनी दिला आहे.
मुळा सहकारी साखर कारखान्याच्या 46 व्या गळीत हंगाम बॉयलर अग्नि प्रदीपन समारंभ प्रसंगी आ. शंकरराव गडाख बोलत होते. मा. खा. यशवंतराव गडाख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुळाचे चेअरमन नानासाहेब तुवर यांनी केले.
बॉयलर पूजा विधी कारभारी डफाळ, कांताबाई डफाळ, निलेश पाटील, अनिता पाटील यांच्याहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी संचालक मंडळ, विविध संस्थांचे पदाधिकारी, सभासद, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी माजी सभापती कारभारी जावळे, अशोकराव गायकवाड,ऍड. बापूसाहेब गायके आदींनी मनोगत व्यक्त केले.
आ. गडाख म्हणाले की, जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर अगोदरच भीषण संकटांचा डोंगर उभा आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पिकांना भाव मिळत नाही, राज्यातील कारखानदारी अडचणीत आली आहे. अशा सर्वच बाजूंनी शेतकरी अडचणीत आहे. अशा परिस्थितीमध्ये समन्यायीच्या आडून मराठवाड्याला पाणी सोडू नये अशी भावना नगर जिल्ह्याची असल्याकडे आमदार गडाख यांनी लक्ष वेधले आहे. मुळा धरणातून जायकवाडीत पाणी सोडल्यास त्याचा सर्वात जास्त फटका नेवासा तालुक्याला बसणार असल्याने पाणी न सोडण्याच्या मागणीस आपला पूर्णपणे पाठिंबा आहे. नगर जिल्ह्यातील लोकभावनेचा अनादर करून खाली पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्यास लाभधारक शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरणार असल्याचे गडाख यांनी सांगितले.





