अहमदनगर – साडेसात कोटींतून शहरात 12 आरोग्यवर्धिनी केंद्रे

नगर, दि. 10 (प्रतिनिधी) – महापालिकेतर्फे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नगर शहरात 12 आरोग्यवर्धिनी केंद्र उभारण्यात येणार आहेत. पंधराव्या वित्त आयोगाच्या साडेसात कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या या आरोग्य केंद्राद्वारे नागरिकांना मोफत तपासणी, उपचार व औषधे दिली जाणार आहेत. काही प्राथमिक रक्त तपासण्याही मोफत केल्या जाणार आहेत. येत्या महिनाभरात यातील सात आरोग्य केंद्रांवर नागरिकांना सुविधा उपलब्ध होणार आहेत. अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे यांनी दिली.
बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात महापालिकेतर्फे सात आरोग्य केंद्रावर सेवा दिली जात आहे. आता आरोग्यवर्धिनी केंद्राच्या माध्यमातून आणखी 12 उपकेंद्रांवर सर्वसामान्य नागरिकांना मोफत आरोग्य सेवा सुरू होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने जागा निश्चित केल्या आहेत.
मनपाच्या अस्तित्वात असलेल्या इमारतीमध्ये नूतनीकरण करून त्यात फर्निचर व इतर साहित्य उपलब्ध केले जाणार आहे. सुमारे 15 ते 20 हजार लोकसंख्येमागे एक यानुसार शहरात झोपडपट्टी, चाळ, गरीब – सामान्य लोकवस्ती असलेल्या भागात सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. आरोग्य तपासणी व उपचार यासह राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमही या केंद्रांवर राबविण्यात येणार आहेत. येत्या पाच वर्षांसाठी सुमारे साडेसात कोटी रुपये खर्चून ही सेवा दिली जाणार आहे.
प्रस्तावित आरोग्यवर्धिनी केंद्रापैकी नालेगाव येथे स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू झाला आहे. आता संजयनगर, समर्थनगर (लालटाकी), शास्त्रीनगर (केडगाव), इंदिरानगर, शिवाजीनगर (कल्याण रोड), बोल्हेगाव, तपोवन रोड येथील सात केंद्रांची कामे पूर्ण झाली आहेत. सोमवारी महापालिकेतील बैठकीत याचा आढावा घेण्यात आला. आरोग्य केंद्रात आवश्यक फर्निचर, साहित्य, वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर्स आदींबाबत प्रक्रिया सुरू आहे. येत्या महिनाभरात या केंद्रांवर नागरिकांना सुविधा उपलब्ध होईल, असे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी सांगितले.
या बारा ठिकाणी आरोग्यवर्धिनी केंद्र
श्रमिकनगर – वैदुवाडी, समर्थनगर (लाल टाकी), नालेगाव – वारुळाचा मारुती परिसर, संजयनगर, शास्त्रीनगर, केडगाव, इंदिरानगर, केडगाव, फऱ्याबाग – सारसनगर, तपोवन रोड, शिवाजीनगर, कल्याण रोड, निर्मलनगर, रामवाडी – सर्जेपुरा, बोल्हेगाव गावठाण





