अहमदाबाद विमान दुर्घटनेत ‘इतक्या’ जणांचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

अहमदाबाद: गुजरातमधील अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी (१२ जून) दुपारी एअर इंडियाच्या फ्लाइट एआय-१७१ चा भीषण अपघात झाला. लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे जाणारे हे बोइंग ७८७-८ ड्रीमलाइनर विमान उड्डाणानंतर अवघ्या पाच मिनिटांत मेघानी नगर परिसरात कोसळले. या दुर्घटनेत १७० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एका हिंदी वृत्तवाहिनीने दिली आहे. विमानात २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्स असे २४२ जण होते. यापैकी १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, ७ पोर्तुगीज आणि १ कॅनडियन नागरिक होते.
बचावकार्य आणि सरकारी प्रतिसाद: अपघातानंतर अहमदाबाद विमानतळावरील सर्व उड्डाणे सायंकाळी ५ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या (एनडीआरएफ) ९० कर्मचाऱ्यांच्या तीन तुकड्या गांधीनगरहून, तर तीन तुकड्या वडोदऱ्याहून घटनास्थळी रवाना झाल्या. अग्नीशमन दल विभागाचे अधिकारी जयेश खडिया यांनी सांगितले की, विमान कोसळल्यानंतर आग लागली, ज्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्नीशमन दल गाड्या पाठवण्यात आल्या. जखमींना अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी ग्रीन कॉरिडोर तयार करण्यात आला आहे.
VIDEO | Ahmedabad Air Crash: Visuals show people running away moments after the Air India flight AI-171 crashed after taking off from the Ahmedabad airport.
The Boeing aircraft, which could be seen losing altitude quickly, crashed in Meghaninagar area near the Ahmedabad… pic.twitter.com/oBOmc3rFDr
— Press Trust of India (@PTI_News) June 12, 2025
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गृह राज्यमंत्री आणि अहमदाबाद पोलिस आयुक्तांशी संपर्क साधून केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन दिले. शाह स्वतः अहमदाबादला रवाना झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिक उड्डयनमंत्री राममोहन नायडू यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला आणि तातडीने सर्व आवश्यक मदत पुरवण्याचे निर्देश दिले. नायडू सायंकाळी ५ वाजता घटनास्थळी पोहोचणार आहेत.
दुर्घटनेची कारणे आणि तपास: विमानाने दुपारी १:३८ वाजता (१३३८ आयएसटी) रनवे २३ वरून उड्डाण केले आणि लगेचच एटीसीला MAYDAY कॉल दिला. त्यानंतर विमानाचा संपर्क तुटला आणि ते बी.जे. मेडिकल कॉलेजच्या डॉक्टर्स होस्टेलवर कोसळले. फ्लायटरडार२४ नुसार, विमान ६२५ फूट उंचीवर असताना त्याचा शेवटचा सिग्नल मिळाला. डीजीसीए आणि विमान अपघात तपास ब्युरो (एएआयबी) यांनी तपास सुरू केला असून, ब्लॅक बॉक्स आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर तपासले जाणार आहे.
नेत्यांचे दुखः व्यक्त: पंतप्रधान मोदींनी ही दुर्घटना “हृदयद्रावक” असल्याचे म्हटले, तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याला “हृदयविदारक आपत्ती” संबोधून शोक व्यक्त केला. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनीही शोक व्यक्त करत बचावकार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी या विमानात असल्याची माहिती आहे, परंतु याची अधिकृत पुष्टी बाकी आहे. एअर इंडियाने हेल्पलाइन क्रमांक १८०० ५६९१ ४४४ जाहीर केला आहे.


