अहमदनगर – मोदींच्या सभेपूर्वीच जाधव व परकाळे स्थानबद्ध

नगर – मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भर सभेत जाब विचारण्याचा इशारा देणारे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांना गुरुवारी दुपारीच शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेऊन मोदींच्या सभेकडे जाण्यापासून रोखले.
पंतप्रधान मोदी यांच्या गुरुवारी दुपारी शिर्डी येथे आयोजित सभेच्या ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेड व ठाकरेंच्या शिवसेनेने दिल्यानंतर पोलिसांनी त्यांची धरपकड करून त्यांना या कार्यक्रमाला जाण्यास मज्जाव केला व पोलिस ठाण्यामध्ये आणून त्यांच्यावर कारवाई केली. मोदी यांनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करावी, असा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर गिरीश जाधव व राजेश परकाळे यांच्यासह गौरव ढोणे, बंटी भिंगारदिवे,अवि मेढे, अरुण रोडे पाटील, मयूर जेधे, भगवान कोकाणे आदींनी पोलिसांनी ताब्यात घेतले.





