Nevase News : नेवासेत रविवारी ‘हिंदू जनआक्रोश’ मोर्चा
Nevase News : या मोर्चास आमदार संग्राम जगताप, आमदार गोपीचंद पडळकर आणि हिंदुत्ववादी कीर्तनकार संग्राम महाराज भंडारे उपस्थित राहणार आहेत.

नेवासे : भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश शेटे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ नेवासे येथे उद्या रविवार, (दि.६) सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता ‘हिंदू जनआक्रोश’ मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चास आमदार संग्राम जगताप, आमदार गोपीचंद पडळकर आणि हिंदुत्ववादी कीर्तनकार संग्राम महाराज भंडारे उपस्थित राहणार आहेत.
नेवासे शहरातून श्री संत ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील खोलेश्वर मंदिर ते नगरपंचायत चौक परिसरातील रस्ता या अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी होत असून नागरिकांची गैरसोय होत असल्याची तक्रार ऋषिकेश शेटे व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी नगर प्रशासनाकडे केलेली होती.
त्यानंतर नगरपंचायत प्रशासनाने हे अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू करत असतांना शेटे यांच्यावर जमावाने हल्ला केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. या घटनेच्या निषेधार्थ रविवारी नगरपंचायत चौक ते नेवासे पोलिस ठाणे असा मोर्चा काढण्यात येणार आहे. या विराट हिंदू मोर्चामध्ये नेवासे तालुक्यासह सकल हिंदू समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.





