India – Singapore : भारत-सिंगापूरमध्ये अग्नि वॉरियर संयुक्त सराव

India – Singapore – भारतीय आणि सिंगापूरच्या सशस्त्र दलांमधील द्विपक्षीय संयुक्त लष्करी सराव अग्नी वॉरियर या तेराव्या पर्वातील सरावाचा आज समारोप झाला. देवळाली इथल्या फील्ड फायरिंग रेंज इथे या सरावाचे आयोजन केले होते.
तीन दिवसांच्या कालावधीत हा सराव फार पडला. या सरावात सहभागी झालेल्या सिंगापूरच्या सशस्त्र दलाच्या तुकडीत सिंगापूर तोफखान्याचे १८२ जवान आणि भारतीय लष्कराच्या तुकडीत भारतीय तोफखान्याच्या ११४ जवानांचा समावेश होता.
या सरावामध्ये दोन्ही सैन्याच्या तोफखान्यानी संयुक्त मारक क्षमतेचे नियोजन, अंमलबजावणी आणि नवीन पिढीच्या अत्याधुनिक उपकरणांचा वापर करण्याबाबतची प्रात्यक्षिके सादर केली.
या सरावामध्ये व्यापक संयुक्त नियोजन आणि तयारी, समन्वय, परस्परांची क्षमता आणि कार्यपद्धती समजून घेणे तसेच भारत आणि सिंगापूरच्या तोफखाना यांच्यात प्रक्रिया विषयक व्यवस्थेतील परस्पर सामायिक इंटरफेस विकास अशा विविध उपक्रमांचा समावेश होता.
या संयुक्त सरावाच्या समारोपानिमित्त आयोजित कार्यक्रमाला भारतीय तोफखान्याचे महासंचालक लेफ्टनंट जनरल अदोष कुमार, स्कूल ऑफ आर्टिलरीचे कमांडंट लेफ्टनंट जनरल एनएस सरना आणि सिंगापूर सशस्त्र दलाच्या शस्त्रागाराचे मुख्य अधिकारी कर्नल ओंग चिओ पेरंग उपस्थित होते.





