अग्नितांडव ! झांशीत रुग्णालयाला भीषण आग; तब्बल ‘इतक्या’ नवजात बालकांचा होरपळून मृत्यू

झासी – उत्तर प्रदेशातील झांशीत ‘महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेज’मध्ये आग लागल्याने १० नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला असून १६ बालके गंभीररीत्या भाजल्याने त्यांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेनंतर देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमधील नवजात शिशु वॉर्डमध्ये भीषण आग लागली. या आगीमुळे या वॉर्डमधील १० नवजात बालकांचा मृत्यू झाला. तर १६ जखमी झाले आहेत.
यातील ३७ बालकांना खिडकीच्या काचा तोडून वाचवण्यात आले आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे सांगितले जात आहे.मृत १० बालकांपैकी ७ अर्भकांचे शवविच्छेदन करण्यात आले असून अद्याप तीन जणांची ओळख पटलेली नाही, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधिक्षक ज्ञानेंद्र कुमार सिंग यांनी दिली.
दरम्यान, राष्ट्रपती द्रौपर्दी मुर्म आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच पंतप्रधानांना मृताच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाखांची मदत जाहीर केली आहे. याशिवाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त करत चौकशीचे आदेश दिले आहेत.
फायर अलार्म नावालाच !
धक्कादायक बाब म्हणजे आग लागल्यानंतर ना फायर अलार्म वाजला, ना वॉर्डात ठेवलेल्या सिलिंडरचा काही उपयोग झाला. सिलिंडर फिलिंग डेट २०१९ आहे आणि एक्सपायरी डेट २०२० आहे. म्हणजे अग्निशमन यंत्राची मुदत संपून अनेक वर्षे लोटली होती आणि हे सिलिंडर नुसते दाखवण्यासाठी येथे ठेवण्यात आले होते.





