#TeamIndia : कपिल देव यांचा रोहितला सल्ला; म्हणाले “संघाचे नेतृत्व करताना…”

नवी दिल्ली :- आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करताना प्रत्येक कर्णधाराकडे आक्रमकता असणे गरजेचे आहे. भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करत असून, त्यानेही आता आक्रमकता दाखवली पाहिजे, असा सल्ला महान गोलंदाज व माजी कर्णधार कपिलदेव यांनी दिला आहे.
एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा ऑक्टोबरमध्ये सुरू होत आहे. त्यापूर्वी आशिया करंडक स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा खरेतर भारतीय संघासाठी लिटमस टेस्ट ठरेल. तसेच याच स्पर्धेद्वारे आगामी विश्वकरंडक स्पर्धेची तयारीही करता येणार आहे. हीच रोहितसाठीही मोठी संधी आहे. त्याने या स्पर्धेपेक्षा विश्वकरंडक स्पर्धेचा विचार करत मैदानावर आक्रमक नेतृत्व करण्याचे धोरण स्वीकारले पाहिजे. त्याने कर्णधार म्हणून अधिक आक्रमक व्हायला हवे, असे कपिल यांनी म्हटले आहे.
क्रिकेट आक्रमकपणेच खेळले गेले पाहिजे. रोहित चांगला कर्णधार आहे, मात्र आता त्याने अधिक आक्रमक होणे गरजेचे आहे. सध्या इंग्लंड व ऑस्ट्रेलिया हे संघ कसे आक्रमक खेळतात व त्यांचे नेतृत्व करणारे कर्णधारही आक्रमकपणेच नेतृत्व करतात. सामना जिंकणे हे पहिले प्राधान्य असले पाहिजे, असेही ते म्हणाले.
भारतीय संघाने प्रथम विश्वकरंडक स्पर्धेत पहिल्या चार संघात स्थान मिळवण्यासाठी आतापासूनच योजना आखली पाहिजे. त्यानंतरच त्यांनी पुढील नियोजन करावे. उपांत्य फेरीसारख्या सामन्यांमध्येही तुम्हाला खेळाबरोबरच नशिबाचीही साथ आवश्यक असते. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या चार संघात स्थान मिळवणे आवश्यक आहे. स्पर्धेतील प्रत्येक सामन्याचा स्वतंत्र विचार करतच खेळले पाहिजे, असेही ते म्हणाले.
खेळाडूंची तुलना करणे योग्य आहे. गेल्या दोन तीन दशकांत आपण अनेक वेगवान गोलंदाज तयार केले आहेत व त्यांची कामगिरी पाहता त्यांच्यावर मदार ठेवू शकतो. सध्या भारतीय संघाला केवळ वेगवान गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलूंची गरज नाही, तर तुम्हाला फिरकी गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूंचीही गरज आहे. भारतीय संघात रवींद्र जडेजासारखे हुशार अष्टपैलू खेळाडू आहेत, त्याचा योग्य वापर केला गेला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
पहिलाच सामना महत्त्वाचा…
विश्वकरंडक स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. मात्र, भारताचा पहिला सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी 8 ऑक्टोबरला होणार आहे. हाच सामना भारतीय संघासाठी महत्त्वाचा आहे. पहिल्याच सामन्यात मिळवलेला विजय संपूर्ण स्पर्धेसाठी आत्मविश्वास देणारा ठरतो. त्यामुळे भारतीय संघाने या सामन्यासाठी आतापासूनच विचार केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.





