Satara News : महाबळेश्वर तालुका पत्रकार संघ आणि शिवसैनिकांचा आक्रमक मोर्चा; ‘शाब्दिक धुलाई’नंतर वाहतूक निरीक्षकाची जाहीर माफी
Satara News : घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे यांनी महाबळेश्वर तालुका पत्रकार संघाला आंदोलनाची भूमिका घेण्याचे निर्देश दिले.

महाबळेश्वर : महाबळेश्वर बस स्थानकात पर्यटकांसह ‘मुक्तागिरी’चे पत्रकार अजित कुंभारदरे यांच्यासोबत उद्धट व अपमानास्पद वर्तन केल्याच्या प्रकरणी वाहतूक निरीक्षक शाहरुख खान याला सातारा विभागीय नियंत्रक ज्योती गायकवाड यांनी तात्काळ निलंबित केले. या कारवाईमुळे जिल्ह्यातील पत्रकार संघटनांनी समाधान व्यक्त केले असून पत्रकार एकजुटीचा हा मोठा विजय मानला जात आहे.
रविवार, ७ जून रोजी दुपारी महाबळेश्वर एसटी आगारात हा प्रकार घडला होता. पर्यटकांशी सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक निरीक्षक खान यांनी पत्रकार अजित कुंभारदरे यांच्याशीही उर्मट भाषेत वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेचे वृत्त समोर आल्यानंतर पत्रकार संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे यांनी महाबळेश्वर तालुका पत्रकार संघाला आंदोलनाची भूमिका घेण्याचे निर्देश दिले. सोमवारी सकाळी महाबळेश्वर तालुका पत्रकार संघाच्या नेतृत्वाखाली पत्रकार, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि सामाजिक संघटनांनी बस स्थानकावर मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली.
आंदोलनाची माहिती मिळताच एसटी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून स्थानकातील बसेस बाहेर हलविल्या होत्या. तसेच पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. आंदोलकांनी “पत्रकार एकजुटीचा विजय असो” अशा घोषणा देत संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली.
आगार प्रमुख महेश जाधव यांनी आंदोलकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांनी संबंधित वाहतूक निरीक्षकाला समोर आणण्याची मागणी केली. खान समोर आल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते; मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली. अखेर खान यांनी सार्वजनिकरीत्या माफी मागितली.
या आंदोलनाला विविध राजकीय पक्षांनी पक्षभेद विसरून पाठिंबा दिला. आंदोलनात तालुकाध्यक्ष रमेश पल्लोड, जिल्हा सदस्य विलास काळे, उपाध्यक्ष सचिन शिर्के, सचिव संजय दस्तुरे, अजित जाधव, अभिजित खुरासणे, प्रेषित गांधी, अजित कुंभारदरे, शरद झावरे, राजेश सोंडकर, राहुल शेलार, संदीप देवकुळे, रियाज मुजावर, संदेश भिसे, जितेंद्र कारंडे, मिलिंद काळे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
तसेच पंचायत समिती सदस्य संजय शेलार, शिवसेना (ठाकरे गट) नेते राजेश कुंभारदरे, महेश गुजर, शंकर ढेबे, शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुख विजय नायडू, वर्षा आरडे, मेघा चोरगे, राजेंद्र पंडित, चंद्रकांत सपकाळ (गुरुजी), सचिन गुजर, गोपाळ लालबेग, सचिन कुंभारदरे तसेच रिपाईचे विनय गायकवाड, मनोज ताथवडेकर, बाळकृष्ण साळुंखे, दीपक वर्पे आदी उपस्थित होते.
या प्रकरणी महाबळेश्वर आणि सातारा पत्रकार संघाच्या वतीने विभागीय नियंत्रक ज्योती गायकवाड यांना निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर तातडीने कारवाई करत शाहरुख खान यांचे निलंबन करण्यात आले.
“पत्रकारितेवर आणि लोकशाही मूल्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात पत्रकार संघटना भविष्यातही एकजुटीने उभ्या राहतील,” असा निर्धार आंदोलनानंतर व्यक्त करण्यात आला.
“आमचे सहकारी अजित कुंभारदरे यांच्यासोबत घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे. संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करून पत्रकार लोकशाही अधिक मजबूत करत असतात. अशा पत्रकारांचा अवमान करून संबंधित अधिकाऱ्याने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. महाबळेश्वर तालुका पत्रकार संघाच्या वतीने आम्ही या प्रकाराचा जाहीर निषेध करीत आहोत.”
विलास काळे (सदस्य, जिल्हा पत्रकार संघ)
“लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा अवमान करणारा हा प्रकार गंभीर आहे. शांत महाबळेश्वरला गालबोट लावणाऱ्या अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी.”
राजेश कुंभारदरे (माजी जिल्हाप्रमुख, शिवसेना ठाकरे गट)
“महाबळेश्वर हे जागतिक पर्यटनस्थळ आहे. येथील पत्रकार पर्यटनस्थळाचा लौकिक जपण्यासाठी काम करत असताना त्यांचा अवमान होणे निषेधार्ह आहे.”
विजय नायडू (शहरप्रमुख, शिवसेना शिंदे गट)
“अधिकाऱ्यांनी जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. नागरिक आणि पत्रकारांशी उर्मटपणे वागणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात शिवसैनिक शांत बसणार नाहीत.”
महेश गुजर (शहरप्रमुख, शिवसेना ठाकरे गट)





