‘द कश्मीर फाइल्स’ बघितल्यानंतर कंगना म्हणाली,’तुकडे-तुकडे गँग नावाचा कॅन्सर देशाच्या बाहेर फेका’

मुंबई : देशभरात सध्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची चर्चा रंगताना दिसत आहे. 11 मार्च रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई करत आहे. चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. दरम्यान, नेहमी वाद ओढवून घेणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतने देखील हा चित्रपट नुकताच पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर कंगनाने एक व्हिडीओ शेअर करून त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
कंगना व्हिडीओमध्ये म्हणते, ‘माझ्या कुटुंबासोबत मी ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पाहिला. विवेक अग्निहोत्री तुम्ही धन्य आहात. या चित्रपटाची निर्मीती केल्यामुळे तुमचा आम्हाला अभिमान वाटतो. गेली कित्येक वर्ष लोक जे पाप करत होते ते तुम्ही धुतले आहेत. मी तुमचे आभार मानते.’ तसेच पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या लोकांबद्दल, भारतातील लोकांबद्दल देखील कंगनाने वक्तव्य केले आहे.
‘तुकडे-तुकडे गँग नावाचा कॅन्सर देशाच्या बाहेर फेका’ असेही या व्हिडीओमध्ये कंगना म्हणाली. ‘या वर्षातील सर्वात महत्वाचा चित्रपट मिस करू नका.’, असे कॅप्शन या व्हिडीओला कंगनाने दिले.
‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची निर्माती अभिषेक अग्रवाल आणि विवेक रंजन अग्निहोत्री यांनी केली आहे. मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, प्रकाश बेलावडी, अनुपम खेर, दर्शन कुमार, भाषा सुंबली, चिन्मय मंडलेकर, पुनीत इस्सर, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वीराज सरनाइक या कलाकारांनी या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली आहे.





