प्रभाग रचनेनंतर आता मतदारयादीतही ‘मोडतोड’; बड्या नेत्यांचा हस्तक्षेप? महापालिका करणार ‘क्रॉस चेकिंग’

प्रभात वृत्तसेवा
पुणे – गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेत मोठ्या प्रमाणात मोडतोड झाल्यानंतर आता महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदारयादीच्या विभाजनातही मोडतोड सुरू असल्याचे समोर आले आहे. सत्ताधारी पक्षातील काही बड्या नेत्यांकडून त्यांच्या प्रभागांमध्ये शेजारील प्रभागांच्या हद्दीवरील अनुकूल मते आपल्या प्रभागात समाविष्ट करण्याचा, तर अनुकूल नसलेली मते इतर प्रभागांमध्ये ढकलण्याचा प्रयत्न होत असल्याच्या तक्रारी निवडणूक विभागाकडे करण्यात आल्या आहेत.
या तक्रारींची दखल घेऊन महापालिका प्रशासनाकडून मतदारयादींच्या प्राथमिक विभाजनाचे क्रॉस-चेकिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठीची जबाबदारी महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांकडे देण्यात आली असून, याबाबतचे आदेश नुकतेच निवडणूक विभागाकडून जारी करण्यात आले आहेत.महापालिकेचे ४१ प्रभाग अंतिम झाले असून, येत्या ११ नोव्हेंबर रोजी या प्रभागांमधील आरक्षण सोडत जाहीर होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रभागनिहाय मतदारयादी विभाजनाचे काम सुरू आहे. महापालिकेची सुमारे ३६ लाख मतदारसंख्या ४१ प्रभागांनुसार विभागून मतदारयाद्या निश्चित करण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी आयुक्त नवलकिशोर राम यांनी दोन उपायुक्तांची पदनिर्देशित अधिकारी म्हणून नेमणूक केली असून, हे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, या मतदारयादी विभाजन प्रक्रियेतही राजकीय हस्तक्षेप झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत.
सत्ताधारी पक्षातील काही इच्छुकांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने आपल्याला अनुकूल नसलेल्या मतदारांची नावे इतर प्रभागांमध्ये हलविल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे काही प्रभागांतील मतदारसंख्या १ लाख २५ हजार ते १ लाख ५० हजारांपर्यंत वाढली आहे, तर काही प्रभागांमध्ये ती केवळ ६५ हजारांवर आली आहे. विशेषतः प्रभागाच्या सीमारेषेवरील मतदारांची नावे स्वतःच्या प्रभागात लावून घेण्यात आल्याच्याही तक्रारी आहेत.
महापालिका करणार शहानिशा..
या तक्रारींची गंभीर दखल घेत महापालिकेच्या निवडणूक विभागाने मतदारयादी विभाजनाच्या कामाची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, सहाय्यक महापालिका आयुक्तांकडे प्रभागनिहाय इतर क्षेत्रीय कार्यालयांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी सहाय्यक अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष सीमारेषा तपासून मतदारयादीतील नोंदींची शहानिशा करायची आहे. हे काम पुढील दोन दिवसांत पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करायचा आहे. यासाठी २८ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, मतदारयादी पदनिर्देशित अधिकारी रवी पवार यांनी त्याची यादी जाहीर केली आहे.





