वाल्मिक कराडनंतर आता ‘खोक्या’ला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट; दोन पोलिसांचे निलंबन होणार?

बीड : माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जाणारा वाल्मीक कराड याच्यानंतर आता आमदार सुरेश धस यांच्या कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याभाईलाही व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचे समोर आले आहे. खायला बिर्याणी आणि हात धुवायला बंद बाटलीतील पाणी, सोबत डझनभर नातेवाइक असा लवाजमा असलेला एक कथित व्हिडीओ सोमवारी सायंकाळी व्हायरला झाला आहे. तसेच मोबाईलवर अनलिमिटेच बोलण्यासही त्याला मिळत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा एक कथित व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. खोक्याला दिली जाणारी व्हीआयपी ट्रीटमेंट पोलीस कर्मचाऱ्यांना भोवणार आहे.
पुन्हा एकदा बीड पोलिस वादात?
सतीश भोसले उर्फ खोक्या हा कारागृह परिसरात खाली बसून जेवण करत आहे. त्याच्या बाजूला १० ते १५ नातेवाइक, कार्यकर्ते उभे दिसत आहेत. हे सर्व असतानाही पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बीड पोलिस वादात सापडले आहेत. बोलण्यासाठी मोबाइलही दिला न्यायालयीन कोठडीत असलेला खोक्या हा जेवणानंतर फोनवर बोलत नातेवाइकांकडे जातो. सोबत एक पोलिस कर्मचारीही असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
दरम्यान, खोक्याला तुरूंगात मदत करणारे ते दोन पोलीस कर्मचारी निलंबित होणार आहेत. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यालाही अधीक्षकांकडून कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याचे म्हटले आहे. सतीश भोसले उर्फ खोक्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्याची शाही बडदास्त ठेवणे दोन पोलीस कर्मचाऱ्यांना भोवणार असल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसात बीडचे पोलीस दल सातत्याने वादात राहिले असून आता त्यामध्ये या नव्या वादाची भर पडली आहे.
सतीश भोसलेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
शिरूर येथील तरुणास अमानुषपणे मारहाण तसेच वन्यजीवांची हत्या या प्रकरणी अटकेत असलेल्या सतीश भोसले या आरोपीस शिरूर न्यायालयात हजार केला असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शिरूर तालुक्यात ढाकणे या तरुणास क्रिकेटच्या बॅटने अमानुषपणे मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला.
त्यानंतर शिरूर तालुक्यातील सतीश भोसले ऊर्फ खोक्याला प्रयागराज येथून अटक करून शिरूर पोलिसांनी आणल्यानंतर एका गुन्ह्यात त्याला सुरुवातीला पोलिस कोठडी त्यानंतर न्यायालयीन कोठडी, मग दुसऱ्या गुन्ह्यात कोठडी आणि आता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली आहे. खोक्यावर एकूण तीन गुन्हे दाखल असून तिसऱ्या गुन्ह्यासाठी पोलिस पुन्हा एकदा त्याला गरज वाटल्यास पोलिस कोठडीत घेऊ शकतात असे तपास अधिकारी यांनी सांगितले आहे.





