मंत्री गडकरींच्या शब्दानंतर आ. लंकेंचे उपोषण मागे

नगर – राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी सुरू केलेले उपोषण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या आश्वासनानंतर चौथ्या दिवशी मागे घेण्यात आले. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपोषणस्थळी भेट देत या मुद्द्यावर थेट केंद्रीय वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना फोन केला. त्यांच्याबरोबर चर्चा केली. आ. लंके यांनीही मंत्री गडकरी यांच्याबरोबर फोनवर चर्चा केली. त्यांच्याकडून ठोस आश्वासन मिळाल्यानंतर शनिवारी दुपारी आंदोलन मागे घेण्यात आले.
नगर-पाथर्डी, अहमदनगर ते कोपरगाव आणि नगर ते करमाळा-टेंभुर्णी या रस्त्यांची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी आमदार निलेश लंके यांनी केली होती. यासंबंधी प्रशासनाकडून देण्यात आलेल्या उत्तरावर समाधान न झाल्याने मागील चार दिवसांपासून ते उपोषण करत होते. जोपर्यंत वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी ठोस शब्द देत नाहीत, तोपर्यंत मी मागे हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष, संघटना यांनीही पाठिंबा दिला होता. रास्ता रोको आंदोलनेही केली होती. लंके यांच्या मागणीबाबत तोडगा निघाला नाही तर कार्यकर्ते आधिक आक्रमक होण्याची शक्यता होती.
मात्र, शनिवारी विरोधी पक्षनेते अजित पवार नगरला आले. त्यांनी उपोषकर्त्यांची भेट घेतली. अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर थेट मंत्री गडकरी यांना फोन केला. आमदार लंके यांनीही या मुद्द्यावर मंत्री गडकरी यांच्याबरोबर संवाद साधला. मंत्री गडकरी यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. गडकरी यांनी आठ दिवसानंतर मी पुन्हा आढावा घेतो असे सांगितले आहे. मी सुद्धा या संदर्भात पाठपुरावा करणार असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले. श्रीगोंदा नजीक येथील उड्डाणपूल काम 28 फेब्रुवारीपर्यंत होईल अशी ग्वाही देण्यात आलेले आहे.
तर नगर पाथर्डी या महामार्गाचे काम 31 मार्च 2023 अखेरीला पूर्ण केले जाईल, असे आश्वासन येथील अधिकाऱ्यांनी लेखी दिले आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले. मी सुद्धा नॅशनल हायवेच्या राज्यातील कामांचा सातत्याने आढावा घेतो यापुढे सुद्धा नगर जिल्ह्यातील या कामांचा आढावा घेतला जाईल व ही कामे कशा पद्धतीने मार्गी लागतील याचा सुद्धा पाठपुरावा करेल असेही ते म्हणाले. प्रशासनाकडून मिळालेल्या लेखी आश्वासनानंतर लंके यांनी उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन पवार यांनी केले. त्यानंतर आमदार लंके यांनी उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले. यावेळी माजी आमदार दादाभाऊ कळमकर, बाळासाहेब हराळ, संदेश कार्ले, घनश्याम शेलार, शिवशंकर राजळे उपस्थित होते.
…हा तर जनतेचा अपमान – पवारांचा पालकमंत्री विखेंना टोला
आमदार लंकेंच्या उपोषणाची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दखल घेतली नाही, असे पत्रकारांनी विचारल्यानंतर पवार म्हणाले, की अशा वेळी राजकारण न आणता दखल घेतली पाहिजे. आ. लंके काही एकटे नाहीत तर आज ते पाच लाख लोकसंख्येच्या पारनेर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. हा जनतेचा अपमान आहे. तुम्हीही कोणत्या तरी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करता. जनतेसाठी तुम्ही निवडून गेलेले आहेत. जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजेत. जनता ज्यावेळी आंदोलन करते त्यावेळी चर्चेतून मार्ग निघतो, असे विरोधी पक्षनेते पवार यांनी सांगितले.
प्रशासनाच्या कारभारावर प्रचंड संताप
गेल्या चार दिवसांपासून कार्यकर्ते, पदाधिकारी व मतदारसंघातील नागरिक येथे होते. आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने त्यांचा प्रशासनावर प्रचंड राग होता. त्यांच्या वक्तव्यातून हे स्पष्टपणे दिसत होते. आंदोलनाची दखल घेतली जात नसेल तर आता रस्त्यावर उतरून आधिक तीव्र आंदोलने करण्याचा इशाराही काहींनी दिला होता. त्यामुळे आंदोलन चिघळणार का, असाही प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, प्रशासनाकडून मिळालेल्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेण्यात आले. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्यांनी आमदार लंके यांना खांद्यावर उचलून घेत एकच जल्लोष केला.
संघर्षाला यश – आ. लंके
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्त्यांच्या कामांची जबाबदारी स्वतः घेतली आहे. रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचा शब्द गडकरींनी मला दिला आहे. रस्त्यांच्या कामांसाठी चांगले ठेकेदार नियुक्त केले जातील. दुरुस्तीची कामे सुरू असून लवकरच पूर्ण होतील असे मंत्री गडकरी यांनी सांगितले आहे. चार दिवसांच्या आंदोलनानंतर या संघर्षाला यश मिळाल्याचे समाधान आहे.





