हिंगोली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना हिंगोली जिल्ह्यात स्वबळावर लढवणार आहे. अशी माहिती शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी दिली आहे. या नगरपालिकेत शिवसेना स्वबळावर लढणार असून धनुष्यबाणाचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक नगरपालिकेमध्ये असतील. हिंगोली कळमनुरी आणि वसमत या तीनही नगरपालिकेमध्ये हीच परिस्थिती असेल. ज्या ज्या ठिकाणी युती होत असेल तिथे युती करा, जिथे युती होत नसेल तिथे मैत्रीपूर्ण लढत द्या. कुणावरही टीका करायची नाही. आपण आपले काम दाखवायचे आणि पक्षाचे वर्चस्व दाखवून द्यायचे, असा निर्धार संतोष बांगर यांनी यावेळी केला आहे. एकनाथ शिंदे यांनी सांगितला आहे की, जिथे युती शक्य आहे तिथे युती करा, अन्यथा स्वबळाची तयारी करा आणि त्यानुसार आम्ही कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत. युती जर केली तर कार्यकर्त्यांवर अन्याय होत असतो. सर्व कार्यकर्त्यांना न्याय मिळावा यासाठी शिवसेना स्वबळावर निवडणुका लढणार आहे. असेही ते म्हणाले. पाचोरा भडगावमध्ये युती फिसकटली जळगावच्या पाचोरा भडगावमध्ये निवडणुकीपूर्वीच युती फिसकटली आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी अलीकडेच स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. यानंतर भाजपच्या वतीने चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी तातडीने बैठक घेऊन भाजपही स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे निवडणुका घोषित होण्यापूर्वीच पाचोरा-भडगाव मतदारसंघात युती फिसकटली असून युतीत निवडणुका न लढण्याचा निर्णय घेणारा पाचोरा मतदारसंघ हा राज्यात पहिला ठरला आहे.यामुळे जळगाव जिल्ह्यात महायुतीतील राजकीय वातावरण तापले आहे. भाजपबरोबर कदापिही जाणार नाही : आमदार किशोर पाटील भाजपबरोबर कदापिही जाणार नाही. माझ्या मतदारसंघात स्वबळावर निवडणुका होतील, अशी घोषणा आमदार किशोर पाटील यांनी केली. विधानसभा निवडणुकीत भाजपने माझ्या विरोधात अमोल शिंदे यांना उमेदवारी दिली. त्यांना विविध प्रकारची मदत केली. त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. उलट त्यांना नवी पदे देण्यात आली.