पिंपरी | उपमुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर गोवंशबाबतचे उपोषण स्थगित

आळंदी, (प्रतिनिधी) – देशी गोवंश बचाव जन आंदोलन संघटनेचे मिलिंद एकबोटे यांच्यासह इतर गौ प्रेमींनी सुरू केलेल उपोषण आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले.
यावेळी देशी गोवंश पालनासाठी प्रतिदिन प्रति गोवंश शंभर रुपये शासनाकडून मिळतील, असे आश्वासन एकबोटे यांना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी फोनवर बोलताना दिले. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
श्री क्षेत्र आळंदी येथे इंद्रायणी घाटावर डॉ. मिलिंद एकबोटे व त्यांच्या सहकार्यांनी देशी गोवंश संरक्षणासाठी देशी गोवंश बचाव जनआंदोलन व उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला आमदार महेश लांडगे यांनी भेट दिली.
यावेळी आमदार लांडगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत मोबाइलद्वारे संपर्क साधला. या चर्चेदरम्यान तो प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे.
राज्य सरकार, केंद्र सरकारकडे गोवंश संरक्षणासाठी एकत्रितपणे पाठपुरावा करू, अशी विनंती आमदार महेश लांडगे यांनी डॉ. मिलिंद एकबोटे यांना केली. उपमख्यमंत्री यांनी दिलेल्या शब्दामुळे व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मिलिंद एकबोटे यांनी तिसर्या दिवशी उपोषण स्थगित केले आहे.
या होत्या आंदोलकांच्या मागण्या- – गौ पालनासाठी प्रति गौ शंभर रुपये मिळावे.
– आळंदी येथील दारूधंदे व वेश्या व्यवसाय बंद करावे.
-इंद्रायणी नदीचे प्रदूषण त्वरित रोखावे.
– भटक्या जनावरांची कत्तल थांबवून स्थानिक स्वराज्य संस्था पातळीवर गो शाळा उभाराव्यात.
– देशी गायरानांचे अतिक्रमण हटवून त्या ठिकाणी गोपालन, चारा लागवडी साठी जमीन उपलब्ध करून द्यावेत.
राज्यातील शेतकर्यांकडे देशी गोवंश आहे त्यांना अनुदान देण्याचा विचार झाला पाहिजे. नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी चिंतेत असतात. गाई व बैल सांभाळ करण्यासाठी त्यांना कसरत करावी लागते. त्यांना सहकार्य मिळणे सर्वात महत्वाचे आहे.
निवडणूक आचारसंहितेपूर्वी तुमचा निर्णय करतो. त्याबाबत तांत्रिक बाबींचा विचार करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहे.- महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा





